एक डझनहून अधिक बंदूकधाऱ्यांनी दिल्ली वाहतूक मंडळाच्या मिलेनियम बसआगारात मंगळवारी पहाटे टाकलेल्या दरोडय़ात सात लाख ५० हजार रुपयांची रोकड लुटली. ४० हजार रुपयांच्या धनादेशांचा यात समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. मिलेनियम बसआगार हे जगातील सर्वात मोठे बसआगार आहे. पहाटे ३.३० च्या सुमारास तीन क्रमांकाच्या रोकड आणि धनादेश विभागात काही जणांच्या गटाने बंदुकीचा धाक दाखवत प्रवेश केला. या वेळी बसआगाराचे रोखपाल विक्रम सिंह हे आपल्या केबिनच्या बाहेर उभे होते.
प्रवाशांच्या रेल्वेतून उडय़ा
बहराइच, उत्तर प्रदेश : गोंडा-बरेली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये काल रात्री रिसिया व मटेरा रेल्वेस्थानकांच्या दरम्यान आग लागली, त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी रेल्वेतून उडय़ा मारल्या. यात कुणीही प्रवासी जखमी झाला नाही. रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. काही प्रवाशांनी त्यांच्या डब्यातून उडय़ा मारल्या व आग लागल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्यांनी सांगितले, की रेल्वे हळू जात होती त्या वेळी अचानक ही आग लागली.
लॉरिन माझेल यांचे निधन
कासलटन, व्हर्जिनिया : संगीतकार लॉरिन माझेल (वय ८४) यांचे व्हर्जिनिया येथे कॅसलटन महोत्सवाची पूर्वतयारी करीत असताना निधन झाले. महोत्सवाच्या समन्वयकांनी सांगितले की,राफानॉक परगण्यात कॅसलटन फार्म या ठिकाणी त्यांचे न्यूमोनियाने निधन झाले. माझेल यांच्या निधनाचे वृत्त या संगीतमहोत्सवाच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहे. माझेल यांनीच या संगीत महोत्सवाची स्थापना त्यांच्या पत्नी डायटलिंडे तुरबान माझेल यांच्या मदतीने २००९ मध्ये केली होती.
अफगाणिस्तानात ८९ ठार
काबूल : पूर्व अफगाणिस्तानातील एका गजबजलेल्या बाजारात दग्र्याजवळ आत्मघातकी हल्लेखोरांनी केलेल्या कार बॉम्बस्फोटात ८९ जणांना प्राण गमवावे लागले आहेत़ तसेच अनेक जण या हल्ल्यात जखमीही झाले आहेत, असे येथील अधिकृत सूत्रांनी सांगितल़े मोहम्मद रेझा खरोटी या प्रमुख प्रशासकाच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात ८० हून अधिक लोक ठार झाले आहेत़ या हल्ल्यात ठार झालेले सर्व सामान्य नागरिक आहेत़ अद्याप कोणत्याही अतिरेकी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही़
मेट्रो अपघातात १९ ठार
मॉस्को : मॉस्को येथे प्रवाशांनी भरलेली मेट्रो रेल्वे रुळावरून घसरल्याने १९ प्रवासी ठार झाले. पश्चिम मॉस्कोत पार्क पोबेडी मेट्रो स्टेशनवर गर्दीच्या वेळी मंगळवारी हा अपघात झाला. मॉस्को येथील मेट्रोच्या आठ दशकांच्या इतिहासात एवढा गंभीर अपघात प्रथमच घडला आहे. रशियन राष्ट्रीय दूरचित्रवाणीने म्हटले आहे की, मेट्रोला अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात झाला. उपमहापौर प्योटर बिरयुकोव यांनी सांगितले की, मृतांची संख्या १९ आहे. मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. पाच जण गाडले गेले आहेत. मॉस्कोच्या आरोग्य विभागाचे प्रमुख जॉर्जी गोलुकोव यांनी सांगितले की, अपघातातील १५० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
संक्षिप्त : बसआगारावर दरोडा
एक डझनहून अधिक बंदूकधाऱ्यांनी दिल्ली वाहतूक मंडळाच्या मिलेनियम बसआगारात मंगळवारी पहाटे टाकलेल्या दरोडय़ात सात लाख ५० हजार रुपयांची रोकड लुटली.
First published on: 16-07-2014 at 12:01 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National and international news in short