एपी, हेलसिंकी

फिनलंडमध्ये रविवारी अतिशय चुरशीने झालेल्या संसदीय निवडणुकीत तिहेरी लढतीत मुख्य पुराणमतवादी पक्षाने विजय मिळवला. उजव्या विचारसरणीचा पॉप्युलिस्ट पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला, तर पंतप्रधान सना मरिन यांचा सोशल डेमॉक्रॅटिक पक्ष तिसऱ्या क्रमांकावर गेल्यामुळे पुन्हा निवडून येण्याची त्यांची आशा धुळीला मिळाली.

मध्य- उजव्या विचारसरणीच्या नॅशनल कोॲलिशन पार्टीने एकूण मतदानाच्या २०.८ टक्के मिळवून विजय मिळवला. २०.१ टक्के मते मिळवून उजव्या विचारसरणीचा ‘दि फिन्स’ पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला, तर सोशल डेमॉक्रॅटिक पक्षाला १९.९ टक्के मतांसह तिसरे स्थान मिळाले.वरच्या स्थानावरील तिन्ही पक्षांना प्रत्येकी सुमारे २० टक्के मते मिळाल्यामुळे, कुठलाही पक्ष स्वबळावर सरकार स्थापण्याच्या स्थितीत नाही. २२ पक्षांच्या २४०० हून अधिक उमेदवारांनी संसदेतील दोनशे जागांसाठी लढत दिली होती.

‘या निकालांच्या आधारे, नॅशनल कोॲलिशन पार्टीच्या नेतृत्वाखाली फिनलंडचे नवे सरकार स्थापन करण्याबाबतची बोलणी सुरू करण्यात येतील’, असे पक्षाचे नेते पेट्टेरी ओरपो यांनी सांगितले.


सना मरिन यांच्याविषयी..

युरोपमधील सर्वात तरुण नेत्यांपैकी एक असलेल्या ३७ वर्षांच्या सना मरिन यांनी रशियाविरोधात युक्रेनला उघड पाठिंबा दिल्याबद्दल, तसेच फिनलंडच्या ‘नाटो’तील प्रवेशासाठी अध्यक्ष सौली निनित्सो यांच्यासोबत प्रयत्न केल्याबद्दल त्यांची जगभरात प्रशंसा झाली होती.

फिनलंडचा आज ‘नाटो’त प्रवेश

ब्रसेल्स : फिनलंड हा मंगळवारी ‘नाटो’चा एकतिसावा सदस्य बनेल, असे या लष्करी आघाडीचे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी म्हटले आहे. ‘उद्यापासून फिनलंड हा आमच्या आघाडीचा संपूर्ण सदस्य बनेल’, असे स्टॉल्टनबर्ग यांनी ब्रसेल्समध्ये पत्रकारांना सांगितले.नाटोचे परराष्ट्रमंत्री मंगळवारी ब्रसेल्समध्ये एकत्र येतील, त्या वेळी फिनलंडच्या सदस्यत्वाची पुष्टी करणारा अखेरचा देश असलेला तुर्कस्तान त्याची अधिकृत कागदपत्रे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांना सोपवेल, असे स्टॉल्टनबर्ग म्हणाले.नाटोच्या इतर सदस्य राष्ट्रांच्या ध्वजांसोबत फिनलंडचा ध्वज फडकावण्याचा कार्यक्रम मंगळवारी दुपारी ‘नाटो’च्या मुख्यालयात होणार आहे.