देशात सर्वधर्मीयांमध्ये सलोख्याचं वातावरण राहावं आणि एकमेकांच्या सहकार्याने विकासाची वाटचाल व्हावी हे मार्गदर्शक तत्व घटनेमध्ये अधोरेखित करण्यात आलं आहे. त्याच अनुषंगाने देशाच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून सातत्याने आवाहन केलं जातं. याच पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी केलेलं एक विधान चांगलंच चर्चेत आलं आहे. हे विधान करताना फारुख अब्दुल्ला यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.
“आता पाण्यासारखा पैसा ओतला जाईल”
फारुख अब्दुल्ला उधमपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका सभेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांबाबत आपली भूमिका मांडली. “परीक्षेची काळ आता दूर नाही. आता इतका पैसा येईल की तुम्हाला काय सांगू. पाण्यासारखा पैसा ओतला जाईल. मंदिराबद्दल चर्चा केली जाईल. याची दाट शक्यता आहे की राम मंदिराचं उद्घाटनही त्याचदरम्यान होईल. तुम्हाला नोकरी नाही, महागाई गगनाला भिडली असेल तरी तुम्ही ते विसरा आणि याचा विचार करा की रामाचे जर कुणी खरेच भक्त असतील, तर ते हे आहेत”, असं फारुख अब्दुल्ला यावेळी म्हणाले.
“भगवान राम हे सगळ्यांचेच”
“मी तुम्हाला सांगतो, भगवान राम हे फक्त हिंदूंचेच भगवान नाहीत. भगवान राम हे प्रत्येकाचे भगवान आहेत. मग तो मुस्लीम असो, ख्रिश्चन असो. जसे आपण म्हणतो अल्ला सगळ्यांचा आहे. तो फक्त मुस्लिमांचाच नाही. एका प्राध्यापकांचं नुकतंच पाकिस्तानमध्ये निधन झालं. त्यांनी त्यांच्या लिखाणात हे नमूद केलंय की भगवान राम यांनाही लोकांना योग्य रस्ता दाखवण्यासाठी अल्लाहकडूनच पाठवण्यात आलंय”, असंही अब्दुल्ला म्हणाले.
विश्लेषण : राहुल गांधी यांची खासदारकी जाणार? वाचा, खासदारकी रद्द होण्याचे नियम काय आहेत?
“जे लोक तुमच्याकडे येऊन म्हणतात की तेच रामाचे खरे भक्त आहेत, ते मूर्ख आहेत. ते रामाला विकू पाहात आहेत. त्यांना रामााशी देणं-घेणं नाहीये. त्यांना सत्तेशी देणंघेणं आहे”, अशा शब्दांत फारुख अब्दुल्ला यांनी भाजपावर टीकास्र सोडलं.