आपल्या देशाचं नाव इंडियाऐवजी भारत केलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे देशात इंडिया आणि भारत या दोन नावांची चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडिया नाव न वापरता भारत हेच नाव वापरण्याचं धोरण केंद्र सरकारने राबवल्याचं दिसून येत आहे. देशाच्या राष्ट्रपतींकडून जी-२० देशांच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला. तसेच केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या विशेष अधिवेशनात देशाचं नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता या नावांवरून वाद सुरू झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत हे नाव देशाची प्राचीन काळापासूनची ओळख असून इंडिया हे नाव इंग्रजांनी दिल्याचा दावा सत्ताधारी करत आहेत. तर विरोधकांकडून त्यावर आक्षेप घेताना राज्यघटनेतील वेगवेगळ्या उल्लेखांचा दाखला दिला जात आहे. तर काही विरोधकांनी दावा केला आहे की, विरोधी पक्षांच्या आघाडीला इंडिया असं नाव देण्यात आलं आहे, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आता थेट देशाचं नाव बदलायला निघाले आहेत.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ओमर अब्दुल्ला म्हणाले, आपण अगदी सुरुवातीपासूनच भारत आणि इंडिया ही दोन्ही नावं वापरतोय. पंतप्रधानांच्या विमानावरसुद्धा भारत आणि इंडिया ही दोन्ही नावं लिहिलेली आहेत. जर पंतप्रधान इंडिया हे नाव वापरणार नसतील तर हरकत नाही. परंतु, सगळीकडची नावं बदलण्याची आवश्यकता नाही. लोकांची स्वतःची मर्जी असायला हवी.

ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून प्रश्न उपस्थित केला की तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचं नाव बदलणार आहात का? इस्रोने नुकतंच चंद्रावर आपलं चांद्रयान यशस्वीपणे उतरवलं आहे, तुम्ही त्या इस्रोचं नाव बदलणार आहात का? आयआयटी, आयआयएमारख्या कित्येक संस्था देशात आहेत त्यांची नावं तुम्ही बदलणार आहात का? केवळ तुमच्या विरोधकांनी स्वतःच्या आघाडीचं नावं इंडिया ठेवलं आहे म्हणून तुम्ही हे सगळं करत असाल तर आम्ही आमचं नाव बदलून टाकतो.

हे ही वाचा >> “पप्पांनी नऊ दिवस काहीच खाल्लं नाही, त्यांची…”, जरांगे पाटलांच्या मुलाचे डोळे पाणावले…

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले, आम्ही आमचं नाव इंडिया ठेवलंय म्हणून तुम्ही देशाचं नाव बदलत असाल तर आम्हाला आपल्या देशाला अडचणीत आणायचं नाही. आम्हाला देशाचा खर्च वाढवायचा नाही. आम्ही देशाचा खर्च वाढवण्यासाठी आलो नाही. आम्हाला जरासा इशारा मिळाला की हे लोक आमच्या आघाडीच्या नावामुळे देशाचं नाव बदलायला निघाले आहेत तर मग आम्ही आमचं नाव बदलून टाकतो. यासाठी देशाचं नाव बदलण्याची गरज नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National conference leader omar abdullah says will change our india alliance name asc