सुशीलकुमार शिंदे यांची भावना
संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरुला फासावर चढविल्याने राष्ट्रकर्तव्याची पूर्तता झाल्याची भावना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गृहमंत्रीपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविली होती आणि ती पार पाडण्याचे कर्तव्य आपण बजावले, असे अजमल कसाबपाठोपाठ चार महिन्यांच्या आत अफजल गुरुला फासावर चढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिंदे म्हणाले.
तिहार तुरुंगात अफजल गुरुला फासावर लटकविले जाण्यापूर्वीच २, कृष्णन मेनन मार्गवरील शिंदे यांच्या बंगल्यातील फोन पहाटेपासून खणखणत होते. काही वृत्तवाहिन्यांचे पत्रकार त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून अफजल गुरुला फासावर चढविले जाणार असल्याचे वृत्त खरे आहे काय, याची शहानिशा करीत होते. पण शिंदे यांनी तेव्हा त्यावर काहीही बोलण्यास नकार दिला. मी तुम्हाला याविषयीची नेमकी स्थिती साडेआठनंतरच सांगू शकतो, असे सांगून त्यांनी नेहमी संपर्कात असणाऱ्या पत्रकारांशी बोलताना वेळ मारून नेली. अफजल गुरुला फासावर चढवेपर्यंत शिंदे यांच्याही संयमाची कसोटी लागली होती.
दोन तासांनंतर अफजल गुरुला फाशी देण्यात आल्याचे अधिकृतपणे जाहीर झाले तेव्हा शिंदे यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारापुढे प्रसिद्धी माध्यमांची झुंबडच उडाली. पूर्ण माहिती घेतल्यानंतरच त्यांनी सकाळी दहा वाजता छोटेसे निवेदन केले आणि ते बंगल्यात परत निघून गेले. अफझलच्या फाशीची बातमी येताच शिंदे यांच्या मोबाईलवर त्यांचे अभिनंदन करणारे असंख्य फोन आणि एसएमएसचा मारा सुरु झाला. शक्यतोवर सर्वांचेच फोन घेण्याचे तसेच प्रत्येक एसएमएस वाचून त्यावर आभार व्यक्त करण्याचे ते प्रयत्न करीत होते. अफजलला फासावर चढवून तुम्ही फार कणखर निर्णय घेतला, असा निर्णय घेण्यासाठी असीम धाडसाची आवश्यकता असते, असे कौतुक करणाऱ्या हजारो एसएमएसनी त्यांचा इनबॉक्स भरून गेला होता.
उद्या अफझलला फासावर लटकविणार असल्याची याची जाणीव असलेले शिंदे शुक्रवारी रात्री उशिरा शांतपणे झोपी गेले. पण पहाटे पहाटे दिल्लीतील पत्रकारांनी मोबाईलवर संपर्क साधून त्यांच्या अतिव्यस्त दिवसाची दिशा निश्चित केली.  बंगल्यात कुणालाही प्रवेश द्यायचा नाही, असे बजावून ते दुपारी सकाळच्या घटनाक्रमाचा आढावा घेत होते. सायंकाळी ताजे टवटवीत होत ते पुन्हा नव्या जोमाने शुभेच्छांचा स्वीकार करण्यात गुंतले. उद्या मेघालय विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते सकाळी शिलाँगला रवाना होणार आहेत.

वस्तुस्थिती देशासमोर आणली  
संघ परिवाराच्या दहशतवादी छावण्यांबाबत काही ठोस माहिती असल्यानेच वस्तुस्थिती देशासमोर आणली, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. आता ही माहिती काही जणांना झोंबत असल्याने त्यांनी आपल्या विरोधात मोहिम उघडलेली दिसते. गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यावर नवे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्याकडे कसाब, अफझल गुरूसह काही फाशीची प्रकरणे आढाव्यासाठी पाठविली होती. आपण त्यावर मत नोंदवून पुन्हा राष्ट्रपतींकडे पाठविली. राष्ट्रपतींनी त्यांचे दयेचे अर्ज फेटाळल्याने फाशीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कसाब आणि अफझल गुरूच्या फाशीमुळे देशवासीयांमध्ये समाधानाचीच भावना असल्याचेही शिंदे म्हणाले.

Story img Loader