गेल्या दोन दिवसांपासून भारताचं राष्ट्रीय मानचिन्ह असलेल्या अशोकस्तंभाच्या प्रतिकृतीवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आधीच वादात सापडलेल्या नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या दर्शनी भागात उभारण्यात आलेली ही प्रतिकृती देखील वादात सापडली आहे. याला कारणीभूत ठरलं आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रतिकृतीसमोर काढलेलं छायाचित्र! या छायाचित्रामध्ये मोदींच्या मागे दिसणारे प्रतिकृतीमधील सिंह अधिक आक्रमक आणि आक्राळविक्राळ दिसत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मूळ मानचिन्हाच्या रचनेमध्ये बदल करून मोदी सरकारने राज्यघटनेचंच उल्लंघन केल्याचा आरोप विरोधकांनी केला असताना त्यावर आता ही प्रतिकृती घडवणाऱ्या शिल्पकारानेच खुलासा केला आहे.
नेमका काय आहे वाद?
नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते नव्या संसद भवनाच्या समोर उभारण्यात आलेल्या या प्रतिकृतीचं अनावरण करण्यात आलं. यावेळी प्रतिकृतीसमोर पंतप्रधानांचं छायाचित्र देखील काढण्यात आलं. मात्र, या छायाचित्रात मोदींच्या मागील प्रतिकृतीमध्ये दिसणारे सिंह अधिक आक्रमक दिसत असून ते सारनाथ येथील मूळ अशोक स्तंभावरील शिल्पापेक्षा खूप वेगळे दिसत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. तसेच, या प्रतिकृतीमध्ये कुठेही सत्यमेव जयते हे मूळ मानचिन्हावर असणारं वाक्य देखील नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
आकार आणि कोनामुळे फरक?
ही प्रतिकृती उभारण्याचं काम सुनील देवरे आणि लक्ष्मी व्यास या दोन शिल्पकारांना सोपवण्यात आलं होतं. यापैकी सुनील देवरे यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना यासंदर्भात खुलासा केला आहे. “मूळ शिल्प आणि प्रतिकृतीमध्ये दिसणारा फरक फक्त आकार आणि विशिष्ट कोनातून काढलेल्या छायाचित्रामुळे वाटतोय. त्यामध्ये दुसरं कोणतंही कारण नाही. जर तुम्ही सारनाथमधील मूळ शिल्प पाहिलं, तर ते हुबेहूब नव्या संसदेसमोरच्या प्रतिकृतीसारखंच दिसेल”, असं सुनील देवरे यांनी म्हटलं आहे.
सुनील देवरे यांनी याआधी अजिंठा आणि वेरूळमधील लेण्यांची देखील प्रतिकृती तयार केली आहे. या वादासंदर्भात बोलताना ४९वर्षीय सुनील देवरे म्हणतात, “मला शिल्पाची प्रतिकृती करण्याचं कंत्राट केंद्र सरकारकडून मिळालेलं नव्हतं. टाटा प्रोजेक्ट लिमिटेडकडून मला हे काम मिळालं होतं. त्यासाठी मी रीतसर अर्ज देखील केला होता. त्यातून माझ्या नावाची निवड झाली.” नव्या संसद भवनाच्या उभारणीचं काम टाटा प्रोजेक्ट लिमिटेडला देण्यात आलं आहे.
विश्लेषण: ‘सिंहमुद्रे’वरून टीकेचे राजकारण का रंगले आहे?
पुरातत्व शास्त्रज्ञ म्हणतात…
दरम्यान, या सगळ्या गोंधळावर पुरातत्वशास्त्रज्ञ बी. आर. मणी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “सारनाथमधील अशोकस्तंभाची उभारणी जवळपास २३०० वर्षांपूर्वी करण्यात आली. भारत आणि इराणमधील तत्कालीन सर्वोत्कृष्ट शिल्पकारांनी हे शिल्प घडवलं होतं. ते हातांनी दगडात कोरलं होतं. आत्ता तयार करण्यात आलेली प्रतिकृती ही धातूपासून तयार करण्यात आली आहे. तिच्याकडे बघण्याचा कोन बदलल्यास फरक पडू शकतो”, असं ते म्हणाले.