संख्येत्मक विस्तारातूनही गुणात्मक निर्मिती राखून राष्ट्रीय पुरस्कारांवर छाप पाडण्याची अलिकडच्या काळातील परंपरा यंदाही मराठी चित्रपटांनी राखली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या ६२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी घवघवीत यश संपादन केले असून, चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाला ‘सुवर्णकमळा’ सर्वोच्च बहुमान मिळाला. ‘किल्ला’ या चित्रपटाला सवरेत्कृष्ट मराठी चित्रपटाचा, तर . ‘एलिझाबेथ एकादशी’ ला सवरेत्कृष्ट बालचित्रपटाचा मान मिळाला.
न्यायव्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटाचे देशविदेशातील अनेक महोत्सवांत कौतुक होत आहे. हा चित्रपट १७ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.
हिंदीमध्ये ‘क्वीन’ या चित्रपटातील भूमिकेसाठी कंगना राणावत हिला सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला. राणावतला २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘फॅशन’ चित्रपटातील भूमिकेसाठीही सवरेत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
‘नानू अवनल्ला अवळू’ या कन्नड चित्रपटात एका पुरुषाच्या शरीरात अडकलेल्या स्त्रीची भूमिका प्रभावीपणे निभावल्याबद्दल विजय या अभिनेत्याला सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला.
शाहीद कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या आणि जम्मू-काश्मीरमधील संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर चित्रित केलेल्या ‘हैदर’ या हिंदी चित्रपटाला पाच पुरस्कार मिळाले. ईशान्य भारतीय मुष्टियोद्धी मेरी कोम हिच्या जीवनावर आधारित आणि प्रियंका चोप्रा हिची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मेरी कोम’ या चित्रपटाला सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ३ मे रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
‘चतुष्कोन’ या बंगाली चित्रपटासाठी श्रीजित मुखर्जी यांना सवरेत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला. या चित्रपटात चार दिग्दर्शकांनी चार लघुपट काढण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांची कहाणी सांगितली आहे.
पुरस्कार जाहीर झाल्यावर सर्वप्रथम मनात आले की या बातमीची याहून चांगली वेळ असू शकत नाही. पुरस्काराची घोषणा चित्रपटाला मोठे प्रोत्साहन आणि चालना देणारी आहे. कितीही पैसे खर्चून हा मान आणि ही प्रसिद्धी मिळाली नसती. आता बरेच प्रेक्षक चित्रपट पाहतील अशी आशा आहे. नवखे कलाकार असलेला हा एक स्वतंत्र चित्रपट असल्याचा मला आनंद आहे. अर्थातच, हा मोठा सन्मान असून आम्हां सर्वाना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे.
– चैतन्य ताम्हाणे, ‘कोर्ट’ चित्रपटाचे दिग्दर्शक
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त सन्मानार्थी
सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट – कोर्ट (सुवर्णकमळ आणि अडीच लाख रुपये) दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – किल्ला (रजतकमळ आणि एक लाख रुपये)
सर्वोत्कृष्ट बालचित्रपट – एलिझाबेथ एकादशी (मराठी) आणि काक्का मुत्ते (तमीळ)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – विजय (नानू अवन्नला अवळू)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कंगना राणावत (क्वीन)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – हैदर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – श्रीजित मुखर्जी (चतुष्कोन)
स्पेशल ज्युरी अवॉर्ड – भाऊराव कराडे (ख्वाडा)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – क्वीन
विशेष उल्लेखनीय चित्रपट – किल्ला आणि भूतनाथ रिटर्न