‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर न्यायालयात हजर राहण्याची नामुश्की तात्पुरती टळली असली तरी काँग्रेस खासदारांनी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले.
विरोधी खासदारांनी थेट लोकसभा अध्यक्षा व राज्यसभेत सभापतींच्या आसनासमोर धाव घेत सत्ताधाऱ्यांना जाब विचारून कामकाज रोखले. राज्यसभेत याच मुद्दय़ावर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यात खडाजंगी झाली. सत्ताधारी सुडाचे राजकारण करीत असल्याचा हल्ला आझाद यांनी केला, तर काँग्रेस या मुद्दय़ाचे राजकारण करीत असल्याचा पलटवार जेटली यांनी केला. काँग्रेस खासदार घोषणाबाजी करून सातत्याने कामकाजात व्यत्यय आणत होते. तब्बल तीनदा कामकाज तहकूब करूनही दोन्ही सभागृहांत तोडगा निघाला नाही. अखेरीस दिवसभरासाठी कामकाज तहकूब झाले. बुधवारीदेखील या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनातील वातावरण गांधी परिवारावरील कारवाईच्या शक्यतेमुळे तापले आहे.
राज्यसभेत आझाद म्हणाले की, भाजपला काँग्रेसमुक्त नव्हे, तर विरोधकमुक्त राजकारण हवे आहे. देशात दोन व्यवस्था अस्तित्वात आहे ज्यात केवळ सुडाचे राजकारण केले जाते. पावसाळी अधिवेशनात मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमधील काही प्रकरणांवरून ठोस कामकाज झाले नाही. एका केंद्रीय मंत्र्यावर गंभीर आरोप झाले; परंतु साधी तक्रार दाखल झाली नाही. परंतु विरोधकांवरील खोटय़ा आरोपांमध्ये सरकारने कारवाईची तत्परता दाखवली. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर मुलीच्या लग्नाचा सोहळा सुरू असताना कारवाई करण्यात आली. आमच्या नेत्यांवरही सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे. आझाद यांनी सर्वपक्षीय विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. केवळ काँग्रेसच नव्हे तर जदयू, राजद, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांविरोधात सूड उगवला जात आहे. जेटली प्रत्युत्तरात म्हणाले की, या प्रकरणी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. यानिमित्ताने भ्रष्टाचारावर सभागृहात चर्चा व्हावी. सरकारने कुणाविरोधात ही कारवाई केली नाही. हा प्रकार काँग्रेसच्या काळात होत असे. काँग्रेसचे आरोप खोटे आहेत. ही कारवाई न्यायालयाने केली आहे. त्यात सरकारची कोणतीही भूमिका नाही. ज्या कामासाठी राजकीय पक्षाला निधी मिळाला होता तो योग्य रीतीने खर्च झाला अथवा नाही, केवळ याची तपासणी न्यायालय करीत आहे. लोकसभेत संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी म्हणाले की, देशात भीषण दुष्काळ आहे. त्यावरील चर्चा सोडून काँग्रेस राजकारण करीत आहे. सोनिया गांधी या वेळी सभागृहात उपस्थित होत्या. त्यांना उद्देशून रूडी म्हणाले की, सोनिया गांधी यांनीच त्यांच्या खासदारांना समजवावे. न्यायालयीन व्यवस्थेवर काँग्रेसला काही म्हणायचे असल्यास त्यांनी म्हणावे; परंतु कामकाज ठप्प करणे योग्य नाही. न्यायालयीन निर्णयाशी सरकारला काहीही देणे-घेणे नाही.

देशात गेल्या आठ महिन्यांत पोलीस कोठडीमध्ये १११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी लोकसभेत देण्यात आली. त्याचप्रमाणे पोलिसांनी छळ केल्याच्या ३३० घटनांची नोंदही याच कालावधीत झाल्याची माहिती या वेळी देण्यात आली. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी याबाबत माहिती देताना पुढे म्हटले आहे की, १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या कालावधीत पोलिसांकडून छळ करण्यात आल्याची २४ हजार ९१६ प्रकरणे उघड झाली आहेत.

बडे व्यापारी आणि आयातदारांनी परदेशात डाळींची मोठय़ा प्रमाणावर साठेबाजी केली असल्याची तक्रार सरकारकडे प्राप्त झाली असल्याची माहिती केंद्रीय अन्नपुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी लोकसभेत दिली. जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ आणि जीवनावश्यक वस्तू पुरवठा परिरक्षण कायदा १९८० अन्वये केवळ देशातील साठेबाजीविरुद्धच कारवाई करता येते, असेही ते म्हणाले.

Story img Loader