पीटीआय, नवी दिल्ली

काँग्रेसशी संबंधित नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्र आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) यांच्या मालकीची ६६१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटिसा बजावल्या आहेत. या प्रकाशन संस्थांविरोधात विरोधात सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीने शनिवारी दिली.

ईडीने प्रसृत केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या मालमत्ता स्थित असलेल्या ठिकाणांच्या संबंधित मालमत्ता निबंधांकडे संबंधित कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. तसेच दिल्लीमधील बहादूर शहा जफर मार्गावरील हेराल्ड हाऊस, मुंबईतील वांद्रा पूर्व येथील प्लॉट क्रमांक २ आणि लखनऊमधील बिशेष्वर नाथ रोडवरील ‘एजेएल’ इमार या मालमत्तांनाही शुक्रवारी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसांमध्ये प्रामुख्याने संबंधित मालमत्ता रिक्त करून ईडीच्या ताब्यात द्याव्यात असे सांगण्यात आले आहे. तसेच वांद्रा पूर्व येथील हेराल्ड हाऊसच्या सातव्या, आठव्या आणि नवव्या मजला व्यापणाऱ्या ‘जिंदाल साउथ वेस्ट प्रोजेक्ट्स लिमिटेड’लाही नोटीस बजावून दरमहा भाड्याचे पैसे ईडीच्या संचालकांच्या नावाने जमा करण्यास सांगण्यात आले आहे.

ईडीने नोव्हेंबर २०२३मध्ये नॅशनल हेराल्ड आणि ‘एजेएल’ची ६६१ कोटी रुपयांची मालमत्ता आणि एजेएलचे ९०.२ कोटी मूल्यांचे समभाग जप्त केले होते. या प्रकरणात ९८८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ईडीचा दावा आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे ‘एजेएल’प्रकाशित करत असलेल्या ‘यंग इंडिया’चे प्रत्येकी ३८ टक्के समभागधारक आहेत. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या तक्रारीवरून खटला दाखल करण्यात आला आहे.