आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेवर पाच वर्षांची बंदी घातली आहे. ही कारवाई सप्टेंबरमध्ये करण्यात आली होती. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा पीएफआय राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या(एनआयए) रडारावर आल्याचे दिसत आहे.
कारण, एनआयएने आज(गुरुवार) पहाटेच केरळमधील पीएफआयशी संबधित असणाऱ्या तब्बल ५६ ठिकाणांवर छापेमारी केल्याचे समोर आले आहे. सुत्रांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
केंद्र सरकारने पीएफआयवर बंदी घातल्यानंतर या संघटनेतील दुसऱ्या फळीतील नेते वेगळ्या नावाने पीएफआयचे काम करत असल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली गेल्याचे समोर आले आहे.
‘‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) आणि जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) या बंदी घातलेल्या संघटनांचे सदस्य ‘पीएफआय’चे संस्थापक आहेत. आयसिससारख्या जागतिक दहशतवादी संघटनांशी ‘पीएफआय’चे धागेदोरे आढळून आले आहेत. एका समाजाच्या धार्मिक भावना भडकवून त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील केले जात होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन ‘पीएफआय’ आणि अन्य संघटनांवर बंदी घालण्यात येत आहे,’’ असे केंद्र सरकारने जारी केलेल्या निवदेनात म्हटलं होतं.