नवी दिल्ली, मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी महाराष्ट्रासह जवळपास १५ राज्यांमधील ९३ ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेवर छापे टाकले. दहशतवादी कारवायांना पाठबळ दिल्याच्या आरोपावरून ‘एनआयए’ने ही कारवाई करून ‘पीएफआय’च्या १०६ जणांना अटक केली. त्यात महाराष्ट्रातील २० जणांचा समावेश आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) नेतृत्वाखाली सक्तवसुली संचालनालय (ईडी), दहशतवादविरोधी पथके, स्थानिक पोलिसांच्या मदतीने हे छापे टाकण्यात आले. महाराष्ट्रासह गोवा, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगण, मध्य प्रदेश, राजस्थान, पुद्दुचेरी आणि दिल्लीत ‘पीएफआय’चे पदाधिकारी आणि कार्यालयांवर ही कारवाई करण्यात आली. ‘‘संघटनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात सबळ पुरावे हाती आल्यानंतर या कारवाईबाबत निर्णय घेण्यात आला. दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठा, दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे भरवणे, दहशतवादी कारवायांसाठी भरती करणे अशा कामांत गुंतलेल्यांवर ही कारवाई करण्यात आली,’’ असे ‘एनआयए’मधील सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा >>> विश्लेषण : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर का कारवाई?
महाराष्ट्रात औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई येथे छापे टाकण्यात आले, असे ‘एटीएस’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यात २० जणांना अटक करून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली एटीएसने मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड येथे चार गुन्हे नोंदवले आहेत. याप्रकरणी काही संशयितांची चौकशी सुरू आहे.
मुंबईत एटीएसने दाखल केलेल्या गुन्ह्यात शेख सादिक, मोहम्मद इक्बाल खान, मजहर खान, मोमीन मिस्त्री व आसिफ खान यांना अटक केली असून, त्यांना गुरुवारी विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने पाचही आरोपींना पाच दिवसांची एटीएस कोठडी सुनावली. पाचही आरोपी ‘पीएफआय’शी संबंधित असून त्यांना मुंबई आणि आसपासच्या परिसरातून अटक करण्यात आली आहे. देशाच्या विरोधात कट रचत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पीएफआय प्रकरणात ‘एनआयए’ने नवी मुंबईतील नेरूळ आणि मुंबईतील ट्रॉम्बे चिता कॅम्प येथेही छापा टाकला. चिता कॅम्प येथे अहमद हबीबउल्ला नावाच्या व्यक्तीला ‘एनआयए’ने ताब्यात घेतले.
‘एनआयए’ने या महिन्याच्या सुरुवातीला ‘पीएफआय’ प्रकरणात तेलंगण, आंध्र प्रदेशात ४० ठिकाणी छापेमारी करून चार जणांना ताब्यात घेतले होते. या कारवाईत ‘एनआयए’ने काही डिजिटल उपकरणे, कागदपत्रे, आठ लाख ३१ हजार ५०० रुपयांची रोकड यासह अन्य साहित्य जप्त केले होते. हे चौघे दहशतवादी कृत्ये करण्यासाठी आणि धर्माच्या आधारावर वेगवेगळय़ा गटांमध्ये शत्रुत्व वाढवण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी शिबिरे आयोजित करीत होते, असा आरोप आहे.
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ‘ईडी’ने ‘पीएफआय’ आणि तिची विद्यार्थी संघटना कँपस फ्रंट ऑफ इंडियाविरोधात (सीएफआय) अफरातफरीचा गुन्हा नोंदवला होता. आरोपपत्रात ‘सीएफआय’चे राष्ट्रीय महासचिव के. ए. रौफ शेरिफ, खजिनदार अतिकुर रहेमान, दिल्लीतील महासचिव मुसाद अहमद, पीएफआयशी संबंधित पत्रकार सादिक कप्पन आणि मोहम्मद आलम यांच्यासह अन्य नेत्यांची नावे होती. यंदा दाखल दुसऱ्या गुन्ह्यात संयुक्त अरब अमिरातीमधील एका हॉटेलचा वापर बेकायदा आर्थिक व्यवहारांसाठी होत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
आज केरळ बंदची हाक
‘एनआयए’च्या कारवाईविरोधात शुक्रवारी ‘पीएफआय’ने केरळ बंदची हाक दिली आहे. ‘रा.स्व. संघाकडून नियंत्रण होणाऱ्या देशातील फॅसिस्ट सरकारने आमचा आवाज दाबण्यासाठी यंत्रणांना हाताशी धरून ही कारवाई केली आहे,’ असे संघटनेने पत्रकात म्हटले आहे. दुसरीकडे, भाजपने केरळ बंद अनावश्यक असून, राज्य सरकारने बंद पुकारणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. ‘व्होटबँकेवर डोळा ठेवून डाव्या पक्षाचे सरकार ‘पीएफआय’बाबत मवाळ भूमिका घेत आहे,’ असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी केला.
आरोप काय?
दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करणे, दहशतवादी कारवायांसाठी प्रशिक्षण शिबिर भरवणे आणि लोकांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी फूस लावणे, असे आरोप ‘पीएफआय’वर आहेत. संघटनेच्या आर्थिक व्यवहारांची ‘ईडी’मार्फत चौकशी करण्यात येत आहे. २०२०ची दिल्ली दंगल, नागरिकत्व कायद्याविरोधातील झालेली आंदोलने, उत्तर प्रदेशातील हाथरस येथील आंदोलनामागे कोण होते, त्यासाठी अर्थपुरवठा कसा झाला, याचाही तपास करण्यात येत आहे.
‘पीएफआय’विषयी..
२००६ साली या संघटनेची स्थापना झाली.
आपली संघटना समाजातील वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी नव सामाजिक चळवळ असल्याचे ‘पीएफआय’चे म्हणणे आहे. मात्र, ही संघटना कडव्या इस्लामी विचारांचा प्रचार करत असल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे.
कुठे किती अटकेत?
* केरळ – २२
* महाराष्ट्र, कर्नाटक – प्रत्येकी २०
* तमिळनाडू – १० * आसाम – ९
* उत्तर प्रदेश – ८ * आंध्र प्रदेश – ५
ल्लमध्य प्रदेश – ४ * पुद्दुचेरी, दिल्ली –
प्रत्येकी ३ * राजस्थान – २