मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी राष्ट्रीय सुरक्षा पथक (एनआयए) पुढील महिन्यात पाकिस्तानचा दौरा करण्याची शक्यता असल्याची माहिती पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी शनिवारी दिली. पाकिस्तानचे न्यायालयीन पथकही पुढील आठवडय़ात भारतामध्ये येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. सार्क राष्ट्रांच्या मंत्रीगटाच्या सप्टेंबर महिन्यात मालदिवमध्ये झालेल्या बैठकीत गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एनआयएच्या पाकिस्तान दौऱ्याचा मुद्दा सर्वप्रथम उपस्थित केला होता. याबाबत दोन्ही देशांमधील मतभेदाचे मुद्दे आता दूर झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.
मलिक सध्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत पाकिस्तानी पथकाच्या भारत दौऱ्याच्या विषयावर चर्चा झाली. दोन्ही देशांच्या सुरक्षा पथकांच्या प्रमुखांनी एकत्र येऊन चर्चा करणे आवश्यक आहे. त्यामुळेच आपण एनआयएच्या पथकाला पाकिस्तान भेटीचे निमंत्रण दिल्याचे मलिक यांनी सांगितले.
दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांच्या आवाजांची चाचणी घेण्यास परवानगी देण्याची मागणीही शिंदे यांनी पाकिस्तानकडे केली आहे. मात्र पाकिस्तानी कायद्यानुसार संबंधित व्यक्तीने परवानगी दिल्याखेरीज ही चाचणी घेणे शक्य नसल्याचे सांगत मलिक यांनी शिंदे यांची मागणी फेटाळली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा