अयोध्येत राममंदिर बांधण्याच्या मुद्दय़ावर सर्व समुदायांच्या लोकांना विश्वासात घेण्यात आल्यानंतर या मंदिराची उभारणी केली जाईल, असे रा. स्व. संघाशी संबंधित मुस्लीम राष्ट्रीय मंचाने म्हटले आहे.
राम हे ‘भारतीयत्वाचे’ प्रतीक असल्याचे सांगून या संघटनेचे प्रवर्तक आणि रा. स्व. संघाचे नेते इंद्रेश कुमार म्हणाले की, हिंदूंसाठी भगवान राम त्या जागेवर असल्याचे ‘सत्य’ असून, मोगल सम्राट बाबरने तुमच्यासाठी अशा प्रकारच्या जागेवर दावा केला नव्हता, ही गोष्ट मुस्लिमांना समजावून सांगण्यासाठी संघटना प्रयत्न करत आहे.
अयोध्योतील बाबरी मशिदीचे नाव मोगल सम्राट बाबर याच्या नावावर ठेवण्यात आले होते आणि ती त्याच्याच कारकीर्दीत बांधली गेली होती, असे मानले जाते.
आम्ही एकमेकांना विश्वासात घेऊ, त्यानंतरच राममंदिर बांधले जाईल. या विषयावर मुस्लिमांशी तसेच इतर समुदायांच्याही लोकांशी बोलण्याची आवश्यकता आहे, असे मंचाचे राष्ट्रीय संयोजक मोहम्मद अफझल यांनी अलीकडेच सांगितले होते.भगवान राम हा बहुतांश हिंदूंसाठी श्रद्धेचा विषय आहे, परंतु बाबर काही मुस्लिमांसाठी श्रद्धेचा विषय नाही, असे सांगून अफझल म्हणाले की, अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांना ‘सत्य’ समजावून सांगण्यासाठी मंच प्रयत्न करत आहे. राममंदिर अयोध्येत बांधलेच गेले पाहिजे असे मंचाशी संबंधित बव्हंश उलेमांचे मत असल्याचा दावाही त्यांनी केला.
वर्ष संपण्यापूर्वी मंदिरउभारणीचे काम – स्वामी
अयोध्येत राम मंदिराचे काम हे वर्ष संपण्याच्या आधी सुरूहोईल, असा दावा भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दिल्ली विद्यापीठात याबाबत आयोजित केलेल्या परिसंवादात स्वामी यांनी न्यायालयात पुराव्यांच्या आधारे यश मिळेल असे सांगितले. अयोध्येत शरयू नदीजवळ आणखी एक मशीद बांधता येईल, मात्र त्याला बाबराचे नाव देऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कृष्णशिष्टाईचा दाखला देत मुस्लिमांनी आम्हाला तीन मंदिरे देऊन ३९ हजार ९९७ मशिदी स्वत:कडे ठेवाव्यात अशी सूचना ट्विटवर केली आहे.