हिंदुस्थान अॅरोनॉटिक्स लिमिटेडचा मध्यवर्ती जेट प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होण्यास उशीर होत असल्यामुळे भारतीय हवाई दलाने सध्या वापरात असलेल्या ‘किरण’ या प्रशिक्षणार्थी विमानांची तांत्रिक आयुर्मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आह़े मंगळवारी राज्यसभेला ही माहिती देण्यात आली़
मध्यवर्ती प्रशिक्षण कार्यक्रमाला बिलंब होत असल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी हवाई दलाने आधीच ‘किरण’चे तांत्रिक आयुर्मान वाढविण्यास सुरुवात केली आह़े प्रशिक्षणासाठी पर्याय उपलब्ध ठेवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचेही संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी सांगितल़े हिंदुस्थान अॅरोनॉटिक्स लिमिटेड किरणला पर्याय ठरणारे नवे प्रशिक्षणार्थी विमान उपलब्ध करून देणार होत़े परंतु विविध कारणांमुळे त्याला गेल्या काही वर्षांपासून विलंब होत आह़े नव्या विमानाचे पंख आणि ढाचा यासंदर्भातील समस्यांचा अद्याप निपटारा झालेला नाही, असेही जेटली यांनी सांगितल़े
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ हफिझ सईदकडून भारतविरोधी वक्तव्ये
नवी दिल्ली : लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हफिझ सईद हा जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ मेळावे घेत असून तो मोठय़ा प्रमाणात भारतावर टीका करीत असल्याची माहिती मंगळवारी लोकसभेत देण्यात आली. हफिझने अलीकडे अनेकवेळा आंतरराष्ट्रीय सीमेनजीक भेटी दिल्या असल्याचे गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितले. या मेळाव्यांमध्ये सईद याने अनेक मेळाव्यांमध्ये भारतावर प्रचंड टीका केली असल्याचे रिजीजू म्हणाले. मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सईद हा सूत्रधार असून आहे.
बाबू बजरंगी यांना तात्पुरता जामीन
अहमदाबाद : सन २००२ मध्ये नरोडा पाटिया येथे झालेल्या जातीय दंगलप्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे नेते बाबू बजरंगी यांना गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी तात्पुरता जामीन मंजूर केला. बजरंगी यांना शिक्षा झाली आहे.न्या. ए.एस.दवे व न्या. सोनिया गोकानी यांनी बजरंगी यांना तात्पुरता जामीन मंजूर करताना डोळ्यांवर उपचार करण्यासाठी ९ ते १६ ऑगस्टदरम्यान तुरुंगातून तात्पुरते मुक्त करण्याचा आदेश दिला. बजरंगी सध्या साबरमती मध्यवर्ती तुरुंगात असून डोळ्यांवर उपचार करण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता.नरोडा येथे झालेल्या दंगलींमध्ये ९७ जण ठार झाले होते आणि त्या प्रकरणी बजरंगी यांना मरेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी यांनाही २८ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
ओडिशामध्ये पुराचे थैमान
भुवनेश्वर : सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ओडिशात जवळपास सगळ्याच नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहात आहेत. पुराचा धोका ओळखून राज्य प्रशासनाने सुमारे १७ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. संपूर्ण ओडिशामध्ये जोरदार पावसामुळे नद्यांना पूर आले आहेत. मात्र जाजपूर आणि भद्रक या जिल्ह्य़ांमध्ये पुराचा उद्रेक मोठा आहे. या जिल्ह्य़ांमधून वाहणाऱ्या बैतारानी या नदीने रौद्ररूप धारण केल्याने जिल्हा प्रशासनाने मोठय़ा प्रमाणावर लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित केले आहे. आतापर्यंत जाजपूर, कटक, संबलपूर, भद्रक आणि केओंझार या जिल्ह्य़ांमध्ये सुमारे १७ हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सुदैवाने राज्याच्या अन्य भागांमध्ये जोरदार पाऊस असूनही परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.