केरळच्या राज्यपाल शीला दीक्षित यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. दीक्षित राजीनामा देतील, अशी चर्चा सुरू आहे. मात्र या अफवा असल्याचे त्यांनी भेटीनंतर स्पष्ट केले. राज्यपालपदी कायम राहण्याबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे मानले जात आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दबाव आणूनही दीक्षित यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. दीक्षित यांना पूवरेत्तर राज्यांमध्ये बदली केली जाईल असे वृत्त आहे. महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल के. आर. शंकरनारायणन यांना पायउतार लागल्याच्या पाश्र्वभूमीवर दीक्षित यांनी राजनाथसिंह यांची भेट घेतल्याचे बोलले जाते.
‘ओदिशाला कर्ज मिळविण्याची परवानगी द्या’
भुवनेश्वर : जागतिक बँक, जपान इंटरनॅशनल को-ऑप. एजन्सी, आशियाई विकास बँक आणि अन्य संस्थांकडून आर्थिक साहाय्य मिळविण्याच्या यादीत ओदिशाचा समावेश करावा, अशी मागणी ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केंद्रीय ग्रामविकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.सर्वासाठी पिण्याचे पाणी योजना राबविण्यासाठी चालू आर्थिक वर्षांत साहाय्य गरजेचे असल्याने आपण ओदिशाचा समावेश राज्यांच्या यादीत करावा, अशी विनंती पटनाईक यांनी गडकरी यांना एका पत्राद्वारे केली आहे. ग्रामीण भागांतील जनतेला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.त्याासाठी पाण्याचे स्रोत निश्चित करावयाचे आहेत. त्यासाठी मोठी पाइपलाइन उभारण्याचा प्रकल्प हाती घेणे आवश्यक आहे, असेही पटनाईक यांनी म्हटले आहे.
चिट फंड कंपनीच्या संस्थापकीय संचालकाला सीबीआयकडून अटक
नवी दिल्ली : कोटय़वधी रुपयांच्या शारदा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी अर्थ तत्त्व समूहाच्या एका संस्थापकीय संचालकांना सोमवारी सीबीआयने अटक केली. सदर संचालकाचे नाव ज्योतिप्रकाश जॉयप्रकाश असे आहे. गेल्या आठवडय़ात सीबीआयने कंपनीचे संचालक संबित खुंटिया यांना अटक केली होती.या कारवाईमुळे सदर घोटाळ्यावर अधिक झोत पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्या दृष्टीने पोलीस अधिक तपास करीत आहेत.