भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे जवळचे सहकारी संजय सिंह यांची नियुक्ती झाल्यानंतर भारतीय कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. संतापलेल्या साक्षी मलिकने कुस्ती सोडल्याची घोषणा केली तर ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया याने आपला पद्मश्री पुरस्कार परत करत असल्याचे जाहीर केले. पद्म पुरस्कार परत करणाऱ्यांमध्ये बजरंग पुनिया हा पहिला व्यक्ती नाही. याआधीही अनेकांनी पुरस्कारवापसीची घोषणा केली होती.
पद्म पुरस्कार परत करता येतो
टाइम्स ऑफ इंडियाने यासंबंधीचे एक वृत्त दिले आहे. इतर पुरस्कारांच्या बाबतीत एखाद्या पुरस्कार्थीला पुरस्कार परत देता येत असेल. पण पद्म पुरस्काराच्या नियमानुसार पुरस्कार परत करण्याची तरतूद नाही. जोपर्यंत राष्ट्रपतींना ठोस काही कारण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही व्यक्तीचा पद्म पुरस्कार रद्द केला जात नाही. जर राष्ट्रपतींनी पुरस्कार परत घेण्याचा निर्णय घेतला तरच एखाद्याला मिळालेला पुरस्कार रद्द करण्यात येतो.
२०१८ साली तत्कालीन गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत सांगितले की, देशाच्या तपास यंत्रणांनी कसून तपास केल्यानंतर आणि संबंधित व्यक्तिच्या चारित्र्याची खडानखडा माहिती काढल्यानतंरच एखाद्या व्यक्तीचे नाव राष्ट्रीय पुरस्कारासाठी अंतिम करण्यात येते. यानंतर प्रथेप्रमाणे पुरस्कारासाठी निवडलेल्या नावांची यादी जाहीर करण्यात येते. पण जर पुरस्कार प्रदान करण्याच्या आधीच जर प्राप्तकर्त्याने पुरस्कार घेण्यास असमर्थता दाखविली तर त्याचे नाव यादीतून वगळण्यात येते.
एखाद्या व्यक्तीला पद्मविभूषण, पद्मभूषण किंवा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असेल तर त्यांचे नाव भारताच्या गॅझेटमध्ये (राजपत्र) प्रकाशित केले जाते. पुरस्कारार्थीचे एक रजिस्टर तयार करण्यात आलेले आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर सदर व्यक्तीने पुरस्कार परत दिला तरी त्याचे नाव या राजपत्र यादीतून वगळले जात नाही.
याआधीही परत केले पद्म पुरस्कार
बजरंग पुनिया याच्या आधी अनेक लोकांनी राष्ट्रीय नागरी सन्मान समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्काराला परत देण्याची भूमिका घेतलेली आहे. अलीकडच्या काळात पंजाबचे माजी मुख्यमंत्री यांनी पुरस्कार परत केला होता. दिवंगत नेते प्रकाश सिंग बादल आणि माजी केंद्रीय मंत्री एस.एस. डिंडसा यांनी आपले पुरस्कार परत केले होते. मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी या दोघांनी आपले पुरस्कार परत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप त्यांचे नाव राजपत्रित यादीतून वगळलेले नाही.