पीटीआय, नवी दिल्ली
भारताच्या सीमा अधिक सुरक्षित, परिभाषित असत्या आणि ‘प्रतिकूलपणे हिसकावून’ घेतल्या गेल्या नसत्या तर भारताने अधिक वेगाने प्रगती केली असती अशी टीका राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी शुक्रवारी केली. गेल्या १० वर्षांमध्ये देशाची ताकद प्रचंड वाढली असल्याचा दावाही त्यांनी केला. ते सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) २१व्या पदप्रदान समारंभाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘रुस्तमजी स्मृती व्याख्याना’त बोलत होते.
डोभाल म्हणाले की, सीमा महत्त्वाच्या असतात कारण त्या आपली स्वायत्तता परिभाषित करतात. ‘‘नजीकच्या भविष्यात, गतिमान आर्थिक विकासासाठी आपल्या सीमा जितक्या सुरक्षित असायला हव्यात तितक्या त्या असतील असे मला वाटत नाही. त्यामुळे सीमा सुरक्षा दलांची जबाबदारी मोठी आहे. त्यांनी २४ तास सतर्क राहणे आवश्यक असते. त्यांना आपले राष्ट्रीय हितसंबंध आणि देशाचे संरक्षण करणे आवश्यक असते.’’ जी जमीन आपल्या ताब्यात असते तीच आपली असते, बाकी न्यायालयांचे काम असते आणि त्याने काही फरक पडत नाही असेही डोभाल यांनी नमूद केले.सरकारने गेल्या १० वर्षांच्या कालावधीत सीमा सुरक्षेकडे प्रचंड लक्ष दिले आहे, या कालावधीत आपली राष्ट्रीय ताकद प्रचंड वाढली असे डोभाल म्हणाले.