क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांनी भरलेली एक बोट बुधवारी पहाटे मलेशियाच्या पश्चिम किनाऱ्यापासून काही अंतरावर बुडून किमान ३२ प्रवासी बेपत्ता झाले, तर ६० प्रवाशांना वाचविण्यात यश आले. ८ प्रवासी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. ही लाकडी नौका कौलालंपूरपासून सुमारे ४ किमीवर असताना वादळी हवामानात मध्यरात्रीनंतर बुडाली. इंडोनेशियाच्या आकेह प्रांतात मजूर म्हणून जाणारे हजारो इंडोनेशियन नागरिक बेकायदेशीररीत्या मलेशियालगतची मलाक्काची सामुद्रधुनी पार करीत असतात. या बोटीतसुद्धा असेच सुमारे ९७ इंडोनेशियन नागरिक होते. पवित्र रमझान महिन्यापूर्वी घरी परतणारे हे मजूर होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पद्मनाभ मंदिरातील खजिना प्रदर्शनासाठी ठेवू -चंडी
तिरुवनंतपूरम : केरळमधील प्रसिद्ध श्रीपद्मनाभ स्वामी मंदिराच्या तळघरात सापडलेला खजिना सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीने प्रदर्शनासाठी सरकार तयार असल्याची माहिती बुधवारी मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी विधानसभेत दिली. मंदिराच्या तळघरात सापडलेला खजिना जगात कुठेही सापडणार नाहीच, पण आजवर अशा खजिन्याचे संवर्धन करण्याचे काम त्या काळच्या त्रावणकोर राजघराण्याने मोठय़ा विश्वासाने केले होते, हे यातून जगासमोर येईल, असे चंडी यांनी स्पष्ट केले.

पुरुलियात कारमधून स्फोटके जप्त
पुरुलिया : जिल्ह्य़ातून एका कारमधून ५०० डिटोनेटर्स आणि ६०० जिलेटिनच्या कांडय़ा पोलिसांनी बुधवारी हस्तगत केल्या. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. तेतुलग्राम गावाजवळ स्फोटकांनी भरलेली एक कार येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती पोलीस अधीक्षक नीलकांत सुधीर कुमार यांनी दिली. स्फोटके माओवाद्यांना पुरवण्यात येणार होती. सुबल महातो आणि जलधर द्वारी अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.

सीरियातील कार बॉम्बस्फोटात सात ठार
बैरूत : इराक सीमेला लागून असलेल्या पूर्व सीरियात बुधवारी झालेल्या कार बॉम्बस्फोटात सुमारे सातजण ठार झाले. यात स्थानिक बंडखोरांचा म्होरक्या आणि विरोधकांचा समावेश आहे. सीरियातील एका निरीक्षण पथकाने दिलेल्या माहितीत दीआर अल-झोर प्रांतातील श्मेतीयेह गावातील ‘अल-कायदा’  या संघटनेशी संबंधित असलेल्या दोन बंडखोर संघटनांच्या कार्यालयांसमोर हा स्फोट झाला. यात किमान सातजणांचा बळी गेल्याचे या पथकाने म्हटले आहे. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.

दोन हजार कोटींच्या नदीजोडणी प्रकल्पास मंजुरी
भोपाळ : क्षिप्रा आणि नर्मदा नदीची यशस्वी जोडणी झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने दोन हजार १४३ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी नर्मदा-मालवा आणि गंभीर नद्यांच्या जोडणी प्रकल्पाला मंजुरी दिली. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली नर्मदा नियंत्रण मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. तीन नद्यांच्या संगमामुळे उज्जन आणि इंदूर जिल्ह्य़ातील मिळून १५८ गावांना सिंचनाचा फायदा होणार आहे. याशिवाय इंदूरच्या यशवंत सागरातही गरज भासेल तेव्हा प्रकल्पातून पाणी घेता येणार आहे. प्रकल्प उभारणीसाठी पुनर्वसनाची गरज नसल्याचे मुख्यमंत्री चौहान यांनी स्पष्ट केले.

रेल्वेतील विक्रेत्याकडून अल्पवयीन मुलीची छेडछाड
बरेली : दिब्रुगढ – नवी दिल्ली राजधानी रेल्वेगाडीत एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी रेल्वेत विक्री करणाऱ्या फेरीवाल्याला पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले आह़े  येथील रेल्वेस्थानकात ही कारवाई करण्यात आली़  एक लष्करी जवान त्याच्या ८ वर्षीय कन्येसह रेल्वेतून प्रवास करीत होत़े  रात्री एक वाजताच्या दरम्यान सर्व प्रवासी झोपेत असताना बालिया रेल्वेस्थानकाजवळ रणजीत (२२) नावाच्या फेरीवाल्याने मुलीला शौचालयाजवळ नेले आणि तिचा विनयभंग केला़  शेजारी मुलगी नसल्याचे पाहून पित्यासह अन्य प्रवासी शोधाशोध करीत शौचालयाजवळ गेले असता हा प्रकार उघडकीस आला़  लोक जमलेले पाहून रणजीतने तेथून पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली़
सकाळी रणजीत पुन्हा विक्रीसाठी आला असताना मुलीने त्याला ओळखल़े  त्यानंतर प्रवाशांनी त्याला पकडून पोलीस नियंत्रण कक्षाला या प्रकाराची माहिती दिली़

एअर इंडियाचे ४७ कर्मचारी बडतर्फ
नवी दिल्ली : सातत्याने गैरहजर राहिल्याच्या कारणावरून एअर इंडिया व्यवस्थापनाने ४७ कर्मचाऱ्यांना (केबिन क्रू) सेवेतून बडतर्फ केले असून अन्य २० जणांवर नोटिसा बजावल्या आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये अधिकाधिक शिस्त यावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
ज्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे ते सर्व कर्मचारी मुंबईतील आहेत तर ज्या २० जणांवर नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत त्यांपैकी १७ जण कोणतेही कारण न देता गेल्या तीन महिन्यांपासून गैरहजर आहेत. यांपैकी काही जण दिल्लीतील आहेत.
तथापि, ज्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे ते कर्मचारी आवश्यक त्या गरजांची पूर्तता करून आणि एअर इंडियाच्या डॉक्टरांकडून तपासणी करून ३० जूनपर्यंत पुन्हा सेवेत रुजू होऊ शकतात, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

नायजेरियातील भीषण स्फोटात २१ ठार
कानो (नायजेरिया) : नायजेरियातील २०० शाळकरी मुलींचे अपहरण करून जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या बोको हराम या संघटनेने आपला मोर्चा आता फुटबॉलप्रेमींकडे वळवला आहे. उत्तर नायजेरियातील दामातुरूमधील नायीनामा परिसरात टीव्हीवर विश्वचषक फुटबॉल सामना पाहणाऱ्या गर्दीत घडवून आणलेल्या भीषण बॉम्बस्फोटात सुमारे २१ जण ठार झाले. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारली नसली तरी याआधी फुटबॉल सामन्यादरम्यान हल्ला करणाऱ्या ‘बोको हराम’वर सरकारचा दाट संशय आहे. ‘बोको हराम’ ही नायजेरियातील दहशतवादी संघटना असून गेल्या पाच वर्षांच्या काळात नागरिकांवर अमानुष अत्याचार केले आहेत.

व्होडाफोन प्रकरण जेटलींनी सीतारामनांकडे सोपवले
नवी दिल्ली : व्होडाफोनशी संबंधित २० हजार कोटी रुपयांच्या करासंदर्भातील वादाशी संबंधित प्रकरण अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थ राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवले आहे. अर्थात राज्यमंत्र्यांकडे हे प्रकरण सोपवण्याचे कारण जेटलींनी दिलेले नाही. मात्र एक वकील म्हणून या प्रकरणाशी ते संबंधित आहेत, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. जेटली यांनी फाईलवर हे प्रकरण सीताराम किंवा महसूल सचिव शक्तिकांत दास यांच्याकडे सोपवावे, असा शेरा मारला आहे. यांच्या पातळीवरही मार्ग निघाला नाही तर पंतप्रधानांकडे ते सोपवावे, अशी इच्छा जेटली यांनी व्यक्त केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कर वादाप्रकरणी लवाद म्हणून सर्वोच्च न्यायायलयाचे माजी न्यायमूर्ती आर. सी. लाहोटी यांची नियुक्तीही सीतारामन यांच्या मान्यतेने झाली.

केदारनाथ परिसरात ४४ मानवी सांगाडे
डेहराडून : उत्तराखंडला गेल्या वर्षी बसलेल्या महापुराच्या तडाख्यात केदारनाथ मंदिराजवळच्या परिसराचे अतोनात नुकसान झाले असून, मार्च महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या शोधसत्रात अधिकाऱ्यांना आतापर्यंत ४४ मानवी सांगाडे मिळाले आहेत.मात्र गौरीकुंडापासून १० हजार ५०० फूट उंचीवर असलेल्या अतिउंच भागांत मंगळवार सायंकाळपासून शोध मोहीम हाती घेण्यात आली. मात्र एकही मानवी सांगाडा आढळला नाही. या परिसरात सांगाडे पडलेले असल्याचे वृत्त आल्याने तेथे शोध घेण्यात येत आहे, असे मारटोलिया यांनी सांगितले.मात्र सर्व सांगाडे मिळेपर्यंत शोध मोहीम सुरूच राहणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितल़े

नागरिकांना ओळखपत्रे देण्याच्या प्रस्तावाला प्राधान्य -केंद्र शासन
नवी दिल्ली : देशातील प्रत्येक नागरिकाला राष्ट्रीय ओळखपत्र देण्याच्या प्रस्तावाला केंद्र शासनाकडून प्राधान्य देण्यात येत आह़े  या संदर्भातील सर्व प्रस्ताव शक्य तितक्या तातडीने तयार करून संमतीसाठी आणावेत, असे बुधवारी शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना बजावले आह़े  ओळखपत्र कार्यक्रमामुळे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी प्रकल्प निर्णायक टप्प्यावर नेणे शक्य होईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितल़े  राष्ट्रीय सुरक्षेसाठी नागरिक नोंदणी प्रकल्पाचे महत्त्व विशद करणारे सादरीकरण या प्रकल्पाचे निबंधक सी़ चंद्रमौळी यांनी गृहमंत्र्यांसमोर केल़े  त्यानंतर सिंग यांनी कर्मचाऱ्यांना प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे निर्देश दिल़े  या प्रकल्पाचे सध्याचे काम व पुढील कामे या संबंधी गृहमंत्र्यांनी या वेळी चर्चा केली़  

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National world and international news in short