नवी दिल्ली : नोंदणीकृत ‘अपरिचित’ राजकीय पक्षांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी प्राप्तिकर विभागाने बुधवारी छापासत्र सुरू केले. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये किमान ११० ठिकाणी एकाच वेळी छापे टाण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातील काही पक्षांच्या व्यवहारांमध्ये गंभीर अनिमितता आढळून आल्याचीही माहिती आहे.

हेही वाचा >>> विरोधी पक्षाचा एकही नेता भाजपाला घाबरणार नाही – राहुल गांधींचा हल्लाबोल!

निवडणूक आयोगाकडे नोंदणी आहे, मात्र त्याबाबत कोणतीही माहिती नाही अशा राजकीय पक्षांवर प्राप्तिकर खात्याने छापे घातले आहेत. अशा पक्षांचे प्रवर्तक, त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर स्थानिक पोलिसांच्या मदतीने बुधवारी एकाच वेळी कारवाई करण्यात आली.

नोंदणीकृत अपरिचित पक्षांच्या व्यवहारांमध्ये मोठा आर्थिक घोळ असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोणतेही लेखापरीक्षण सादर न करता वर्षांनुवर्षे करांमधून सवलती मिळवल्या जात असल्याचाही संशय आहे. अधिकृत आकडेवारीनुसार देशात तब्बल २,८०० नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्ष अस्तित्वात आहेत. निवडणूक आयोगाने कायद्यात बदल करून अशा पक्षांची मान्यता रद्द करण्याचे अधिकार विधीखात्याकडे मागितले आहेत. मात्र त्यावर केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही.

दिल्लीतील संस्थांवर..

‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’ आणि ऑक्सफॅम इंडिया या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेच्या दिल्लीतील आस्थापनांवर प्राप्तिकर खात्याने बुधवारी छापे टाकले. परकीय योगदान नियंत्रण कायद्यांतर्गत ही कारवाई केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. याखेरीज अन्य तीन स्वयंसेवी संस्थांवरही छापे टाकण्यात आल्याचे समजले आहे.

कशाच्या आधारावर?

निवडणूक आयोगाने १९८ पक्षांशी संबंधित २,१०० ठिकाणे कारवाईसाठी निवडली होती.  प्राप्तिकर खात्याचे बुधवारचे छापे याच माहितीच्या आधारे असल्याचे मानले जात आहे.

काय आढळले? निवडणूक कायद्यांचे उल्लंघन, आर्थिक उलाढालींची माहिती न देणे, पदाधिकारी आणि कार्यालयांचे पत्ते अद्ययावत न करणे अशा अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत.

घटनाक्रम.. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या महसूल खात्याला या पक्षांबाबत  माहिती दिली. महसूल खात्याने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे ही माहिती वर्ग केली. या माहितीच्या आधारे बुधवारी प्राप्तिकर खात्याच्या विविध विभागांनी एकाच वेळी कारवाई सुरू केली.