युक्रेनच्या सीमेनजिक आपले सैन्य ठेवण्याचे रशियाचे कृत्य योग्य नसून, त्यांनी ते सैन्य तेथून मागे घ्यावे आणि युक्रेनच्या सार्वभौमत्वाचा आदर राखण्यासाठी चर्चेच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन ‘नाटो’चे सरचिटणीस अ‍ॅण्डर्स रॅस्म्युसेन यांनी केले आहे.
रॅस्म्युसेन यांनी शुक्रवारी बल्गेरियाचे अध्यक्ष रोसेन प्लेव्हनेलीव्ह यांची भेट घेतली. बळाचा वापर करून युरोपच्या नव्या सीमारेषा आखण्याचा प्रयत्न रशियाने चालविला असून, युक्रेनच्या सार्वभौमत्वास मर्यादित करणे हा त्याचाच एक भाग आहे. आंतरराष्ट्रीय नियमांना बगल देऊन इतर राष्ट्रांवर प्रभाव टाकणे हाही रशियाचा हेतू असल्याचे रॅस्म्युसेन यांनी सांगितले. रशियाच्या अवैध कारवायांमुळे निर्माण झालेल्या अस्थैर्यास तोंड देण्यासाठी पावले उचलण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. युक्रेनच्या पेचप्रसंगावर राजकीय तोडगा काढण्यात यावा, असे आवाहन रॅस्म्युसेन यांनी केले. नाटो संघटनेची राष्ट्रे लष्करी कारवाईच्या बाजूने नसल्याचेही त्यांनी सांगितले.