पेट्रोल आणि डिझेलच्या पाठोपाठ आता नैसर्गिक वायूच्या किंमती देखील वाढवण्यात आल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्यानंतर केंद्र सरकारने गुरुवारी हा निर्णय जाहीर केला आहे. यानुसार, नैसर्गिक वायूच्या किंमती तब्बल ६२ टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत. हाच नैसर्गिक वायू सीएनजी इंधन बनवण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम सामान्यांच्या खिशावर आणि त्यांच्या आर्थिक गणितांवर पडण्याची शक्यता आहे. १ ऑक्टोबर अर्थात आजपासूनच पुढच्या ६ महिन्यांसाठी ही दरवाढ लागू होणार आहे. नैसर्गिक वायूचं उत्पादन करणाऱ्या ओएनजीसीसारख्या कंपन्यांमध्ये ही दरवाढ तातडीने लागू करण्यात आली आहे.

सीएनजी, घरगुती गॅस महागणार?

केंद्रानं जाहीर केलेल्या किंमतीनुसार, १ ऑक्टोबरपासून कठीण तेल क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक वायूचे दर प्रति दशलक्ष ब्रिटीश थर्मल युनिटसाठी (BTU) २.९० डॉलर इतके असणार आहेत. हा नैसर्गिक वायू प्रामुख्याने सीएनजी आणि मोठ्या शहरांमध्ये पाईपद्वारे पुरवण्यात येणाऱ्या घरगुती गॅसच्या निर्मितीमध्ये वापरला जातो. त्यामुळे नैसर्गिक वायू दरवाढीपाठोपाठ सीएनजी आणि पाईपने पुरवल्या जाणाऱ्या घरगुती गॅसच्या किंमती देखील वाढण्याची शक्यता आहे.

परिणाम काय?

नैसर्गिक वायूच्या किमतीतील वाढीमुळे सीएनजी, तसेच मुंबई व दिल्लीसारख्या शहरांमधील पाइपने मिळणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत १० ते ११ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, यामुळे वीजनिर्मितीच्या खर्चातही वाढ होईल, मात्र वायूपासून तयार होणाऱ्या विजेचे प्रमाण अतिशय कमी असल्याने ग्राहकांना त्याची फारशी झळ पोहोचणार नाही.

Story img Loader