सत्तास्थापनेसाठी अपक्षांचा आधार घ्यावा लागणार
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पक्षाने नुकत्याच झालेल्या पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत लक्षणीय यश मिळविले असले तरी त्यांना सत्तास्थापनेसाठी अपक्षांचा आधार घ्यावा लागणार आहे. या निवडणुकीत २५ अपक्ष खासदार निवडून आले आहेत.
पाकिस्तानात ११ मे या दिवशी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे अंतिम निकाल निवडणूक आयोगातर्फे मंगळवारी घोषित करण्यात आले. त्यानुसार शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) पक्षाने २७२ पैकी १२२ जागा जिंकल्याचे स्पष्ट झाले. सत्तास्थापनेसाठी किमान १३७ जागा आवश्यक असल्याने शरीफ यांच्या पक्षाला १५ जागा कमी पडत आहेत. यासाठी त्यांना अपक्ष खासदारांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. यासाठी त्यांची भिस्त प्रामुख्याने २५ अपक्ष खासदारांवर असेल. या आधीच्या सरकारमधील मुत्तहिदा कौमी मूव्हमेंट या घटक पक्षाने १६ जागा जिंकल्या, तर उलेमा-ए-इस्लाम या पक्षाला १० जागांवर समाधान मानावे लागले.
निवडणूक आयोगाने अद्याप बलुचिस्तान, पंजाब प्रांत आणि सिंध येथील १८ जागांचे निकाल घोषित केलेले नाहीत.
प्रमुख पक्षांचे संख्याबळ : एकूण जागा २७२
पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) – १२२
पाकिस्तान पीपल्स पार्टी – ३१
पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ – २६
मुत्तहिदा कौमी मूव्हमेंट – १६
उलेमा-ए-इस्लाम – १०
काहीसा अपेक्षाभंग
या निवडणुकीत शरीफ यांच्या पक्षाला किमान सव्वाशे जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता; मात्र हा अंदाज चुकल्याने शरीफ यांना अपक्षांच्या साथीने सरकार बनवावे लागणार आहे. अतिमहत्त्वाकांक्षी इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाची उडी केवळ २६ जागांवर मर्यादित राहिली तर सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीची पार धुळधाण उडाली, या पक्षाला केवळ ३१ जागा जिंकता आल्या.
खैबर-पख्तुनख्वामध्ये ‘तेहरिक’ला संधी
माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा तेहरिक- ए -इन्साफ पक्ष दहशतवादी कारवायांनी त्रस्त असलेल्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात सत्तेत येणार आहे. त्यांच्या पक्षाला जमाते-इस्लामीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीगचा नवाझ गट आणि इतर छोटय़ा पक्षांना सत्ता स्थापनेची संधी मिळणार आहे.
खैबर-पैख्तुनख्वा प्रांतात थेट निवडून येणाऱ्या सदस्यांमध्ये इम्रान खान यांच्या पक्षाला ९९ पैकी ३५ जागा मिळाल्या. जमाते-इस्लामीला सात जागा मिळाल्या असून सरकार स्थापनेसाठी त्यांनी ‘तेहरिक’ला पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्रिपदासाठी इम्रान यांच्या पक्षाने परवेझ खट्टक यांच्या नावाची घोषणा केली आहे. याखेरीज सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी माजी मंत्री अफताब अहमद खान शेरपाव्ह यांच्या कौमी वतन पक्षाबरोबर चर्चा सुरू आहे. त्या पक्षाने सात जागा जिंकल्या. प्रचारात इम्रान खान यांनी आक्रमक प्रचाराद्वारे अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यांचा निषेध करीत ती विमाने पाडू, असा इशारा दिला होता. तर अमेरिकेबरोबर संबंधात व्यवहार्य भूमिका घेण्याचा नवाझ गटाचा प्रयत्न आहे.
नवाझ शरीफ जादुई आकडय़ापासून दूर
सत्तास्थापनेसाठी अपक्षांचा आधार घ्यावा लागणार पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पक्षाने नुकत्याच झालेल्या पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत लक्षणीय यश मिळविले असले तरी त्यांना सत्तास्थापनेसाठी अपक्षांचा आधार घ्यावा लागणार आहे. या निवडणुकीत २५ अपक्ष खासदार निवडून आले आहेत.
First published on: 15-05-2013 at 02:04 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navaj sharief away from the magical figure