उधमपूरमध्ये जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी नावेद मोहम्मद याकूब याने गेल्या डिसेंबर महिन्यांत जमात-ऊद-दावाच्या (जेयूडी) परिषदेत सुरक्षारक्षकाचे काम होते, अशी माहिती उघड झाली आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हफीज सईद याच्या जमात-ऊद-दावा संघटनेने लाहोरमधील मिनार-ए-पाकिस्तानमध्ये एक परिषद आयोजित केली होती.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवर चर्चा होणार होती, त्यावेळी पाकिस्तानला सदर माहिती देण्यात येणार होती. पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमधील जंगलात नावेदने लष्कर-ए-तोयबाच्या छावणीत शस्त्रांचे प्रशिक्षणही घेतले होते. या छावणीत एकूण ४० प्रशिक्षणार्थी होते.
या प्रशिक्षणानंतर जमात-ऊद-दावाने डिसेंबर २०१४ मध्ये मिनार-ए-पाकिस्तान येथे ‘इजतेमा’ परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी नावेदसह सर्व प्रशिक्षणार्थींना मुझफ्फराबादहून लाहोर येथे सुरक्षेसाठी आणण्यात आले होते.
नावेदला अत्यंत मोक्याच्या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. ज्या १७ पाकिस्तानी नागरिकांनी विविध ठिकाणी नावेदला प्रशिक्षण दिले त्यांची नावेही पाकिस्तानला देण्यात येणार होती.
नावेद हा पाकिस्तानचाच नागरिक असल्याचे सिद्ध करण्यासाठी तो वापरत असलेल्या भ्रमणध्वनीचा तपशील मिळविण्यासाठी सरकार अमेरिकेची मदत घेणार आहे. नावेदचा राष्ट्रीय नोंदणीत उल्लेख नसल्याचा दावा पाकिस्तानने केला असला तरी त्याच्याकडे पाकिस्तानचे ओळखपत्र असल्याचे पुरावे भारताकडे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा