पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर त्यांच्या मोठ्या बहिणीने गंभीर आरोप केले आहेत. सिद्धूंनी पैशांसाठी आपल्या आईला म्हातारपणी वाऱ्यावर सोडलं असा आरोप सुमन तूर यांनी केला आहे. सुमन अमेरिकेत वास्तव्यास असून सिद्धू फार क्रूर व्यक्ती असल्याचं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूमन सध्या चंदिगडमध्ये असून शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना काही धक्कादायक आरोप केले. वडिलांच्या मृत्यूनंतर १९८६ मध्ये सिद्धू यांनी मला आणि आईला बाहेर काढलं असा आरोप त्यांनी केला. १९८९ मध्ये रेल्वे स्थानकावर आपल्या आईचा मृत्यू झाल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

“आम्ही फार वाईट वेळा पाहिल्या. माझी आई चार महिने रुग्णालयात होती. मी जे काही सांगत आहे त्याचे कागदोपत्री पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. संपत्तीसाठी सिद्धू यांनी आपल्याशी सर्व संबंध तोडले असाही आरोप त्यांनी केला. “माझ्या वडिलांनी घर, जमीन अशी संपत्ती मागे सोडली होती.” अशी माहिती सूमन तूर यांनी दिली.

“सिद्धू यांनी पैशांसाठी माझ्या आईला वाऱ्यावर सोडलं. आम्हाला त्यांच्याकडून कोणतेही पैसे नकोत,” असं त्यांनी म्हटलं. दरम्यान यावेळी त्यांनी सिद्धू एक क्रूर व्यक्ती असून इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत आई-वडील विभक्त झाल्याची खोटी माहिती दिली असा आरोप केला.

सिद्धू माझ्या आई-वडिलांबाबत जे काही सांगत आहेत ते खोटं आहे असं सुमन तूर यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी सिद्धू यांच्याकडे आई-वडील विभक्त झाल्याचे पुरावेदेखील मागितले.

“सिद्धूने मला ब्लॉक केलंय”

सुमन तूर यांनी यावेळी आपण २० जानेवारीला भेटण्यासाठी गेले होते, पण दरवाजा उघडण्यास तसंच भेटण्यास सिद्धू यांनी नकार दिला असा दावा केला आहे. “सिद्धूंना संपर्क साधण्याचे सर्व प्रयत्न अपयशी झाल्यानंतर पत्रकार परिषद घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यांनी मला फोनवर ब्लॉक केलं आहे. त्यांचे नोकरही दरवाजा उघडत नाहीत. मला माझ्या आईसाठी न्याय हवा आहे,” असं त्यांना सांगितलं.

“मी आता ७० वर्षांची आहे आणि यावेळी कुटुंबाबाबत अशा गोष्टींचा खुलासा करणं माझ्यासाठी फार अवघड आहे,” असं त्यांनी सांगितलं.

पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु असतानाचा सिद्धू यांच्या बहिणीकडून हे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सिद्धू मुख्यमंत्रीपद मिळतील अशा आशेत आहेत. पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला ११७ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navjot sidhu sister suman toor claims he deserted mother for money sgy