पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गट गटबाजी उफाळून आली आहे. काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या कार्यप्रणालीवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर त्यांनी दिल्लीवारी करत काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पंजाब काँग्रेसमध्ये नवजोत सिंह सिद्धू यांना महत्त्वपूर्ण भूमिका मिळणार असल्याचे संकेत देण्यात आलेत. प्रियंका गांधी यांच्यासोबत झालेल्या मुलाखतीनंतर प्रियंका गांधी यांनी सुचवलेल्या तोडग्याला त्यांनी होकार दिला आहे. आता येत्या ४८ तासात काँग्रेस पत्रकार परिषद घेत त्यांना देण्यात येणाऱ्या जबाबदारीची घोषणा करणार आहे. पंजाबचे उपमुख्यमंत्री म्हणून सिद्धू यांच्या नावाची चर्चा असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
पुढच्या वर्षी पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. प्रियंका गांधी यांच्यासोबत बैठक पार पडल्यानंतर नवजोत सिंह सिद्धू यांनी ‘प्रियंका गांधी यांच्यासोबत बैठक पार पडली’, असं ट्वीट केलं आहे.
Had a long meeting with @priyankagandhi Ji pic.twitter.com/Wd4FYXFrhr
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) June 30, 2021
यापुर्वी, पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी देखील आमदारांशी चर्चा केली होती. तसेच काँग्रेसमधील गटबाजी संपवण्याच्या उद्देशाने काँग्रेस समितीतर्फे स्थापन केली होती. तीन सदस्यांच्या समितीने अहवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
राजस्थान काँग्रेसमध्येही गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत कलह आहे. सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रियंका गांधी पुन्हा एकदा पुढे आल्या असल्याचं बोललं जात आहे. जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सचिन पायलट नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे प्रियंका गांधी यांनी सचिन पायलट यांच्याशी संपर्क साधला आहे. तसेच योग्य निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.