पंजाब कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू १९८८ रोडरेज प्रकरणी मागील सहा महिन्यांपासून पटीयाला मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. रोडरेज प्रकरणी सर्वोच न्यायालयाने सिद्धू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. कारागृहात असतानाही सिद्धू यांनी पीळदार शरीरयष्टी ठेवण्यासाठी व्यायाम आणि योगा करून तब्बल ३४ किलो वजन घटवलं आहे. सिद्धू यांचं वजन आता ९९ किलो एवढं झालं आहे. क्रिकेटच्या मैदानात जसं सिद्धू यांचा जबरदस्त फिटनेस होता, जणू काही तशाच प्रकारची शरीरयष्टी त्यांनी कारागृहात असताना पुन्हा कमावली आहे, अशी माहिती त्यांचे सहाय्यक आणि माजी आमदार नवतेज सिंह चीमा यांनी दिलीय.
१९८० आणि १९९० च्या दशकात नवजोत सिंह सिद्धू यांनी क्रिकेटचं मैदान गाजवलं होतं. ६ फूट २ इंच उंची असलेल्या सिद्धू यांनी क्रिकेट खेळताना फिटनेसवर विशेष लक्ष दिलं होतं. आज तब्बल ४० वर्षांनंतर त्यांनी पुन्हा एकदा कंबर कसली असून जबरदस्त शरीरयष्टी बनवली आहे. तुरुंगात शिक्षा भोगत असतानाही सिद्धू यांनी योग्य प्रकारे व्यायाम, योगा आणि सकस आहाराच्या जोरावर ३४ किलो वजन कमी केलं आहे. नवतेज सिंह चीमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू यांनी कारागृहात जवळपास चार तास ध्यान केलं. दोन तास योगा करण्याचा प्रयत्न केला. तसंच व्यायाम करण्यावरही त्यांनी विशेष लक्ष दिलं.
दोन ते चार तास वाचन करण्यावरही त्यांनी भर दिला आणि दिवसभरातून चार तास झोप घेतली. जेव्हा सिद्धू शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर पडतील, त्यावेळी त्यांना पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. क्रिकेट खेळताना त्यांचा जसा फिटनेस होता, त्याचप्रमाणे आताही त्यांनी फिटनेसवर मेहनत घेतलीय. त्यांनी आतापर्यंत ३४ किलो वजन घटवलं असून पुढेही हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यांचं वजन आता ९९ किलो झालं आहे. ६ फूट आणि २ इंच उंच असणारे सिद्धू पूर्वीप्रमाणेच हॅंडसम दिसत आहेत. शुक्रवारी कारागृहात जवळपास ४५ मिनिटं मी त्यांच्याशी चर्चा केली. तसंच त्यांचं आरोग्य ठणठणीत असल्यांचं त्यांनी मला सांगितलं, अशी माहिती चीमा यांनी दिली.