सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे ती पंजाबमधल्या राजकीय भूकंपाची! काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी नवज्योत सिंग सिद्धू यांनी देखील पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आपापसांत मतभेद आणि पराकोटीचे वाद असलेल्या या दोन्ही नेत्यांनी राजीनामा दिल्यामुळे पंजाबमध्ये अक्षरश: राजकीय उलथापालथ होतेय की काय असं दिसू लागलं. त्यापाठोपाठ पंजाब मंत्रिमंडळातील रझिया सुलताना यांनी देखील मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे तर ही परिस्थिती अधिकच गोंधळाची झाली. या सर्व पार्श्वभूमीवर आता नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे.
पंजाब काँग्रेसमध्ये राजकीय गोंधळ सुरू असताना एकीकडे मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे, तर दुसरीकडे नवज्योत सिंग सिद्धू यांनी देखील व्हिडीओ ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “१७ वर्षांचा माझा राजकीय प्रवास एका हेतूने होता. पंजाबच्या लोकांचं आयुष्य सुधारणं आणि मुद्द्यांच्या राजकारणावर स्टँड घेऊन ठामपणे उभं राहणं हाच माझा धर्म आहे”, असं ते म्हणाले.
https://twitter.com/sherryontopp/status/1443082640689545216
पंजाबमध्ये सध्या…
दरम्यान, या व्हिडीओमध्ये त्यांनी पंजाबमधल्या सध्याच्या परिस्थितीवर देखील भाष्य केलं आहे. “मी नेहमीच पंजाबी जनतेच्या भल्यासाठी लढत राहीन. त्यांना पाठिंबा देण्यासाठी कायम उभा राहीन. माझ्या वडिलांनी मला नेहमीच सत्याच्या मार्गावर चालायला शिकवलं आहे. मी कधीही माझ्या तत्वांशी तडजोड करणार नाही. माझ्या नैतिकतेशी तडजोड करणार नाही. पंजाबमध्ये सध्या समस्या आणि धोरणांशी तडजोड होत असल्याचं मला दिसतंय. मी हाय कमांडला फसवू शकत नाही आणि त्यांची फसवणूक होऊ देऊ शकत नाही”, असं सिद्धू या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत. तसेच, “ज्यांनी गैरव्यवहार करणाऱ्यांना क्लीनचिट दिली, त्यांच्यावरच पुन्हा जबाबदारी सोपवली आहे”, असं देखील नवजोत सिंग सिद्धू यांनी म्हटलं आहे.
Punjab Chief Minister Charanjit Singh Channi holds a state cabinet meeting in Chandigarh. pic.twitter.com/V6UzdvGml7
— ANI (@ANI) September 29, 2021
पंजाबमध्ये काँग्रेसला धक्क्यावर धक्के! आता महिला कॅबिनेट मंत्री रझिया सुलताना यांचा राजीनामा!
नवजोत सिंग सिद्धू पुढे काय करणार?
दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अजूनपर्यंत पुढील राजकीय वाटचालीविषयी स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र, नवजोत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसचं काम करत राहणार असल्याचं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. रझिया सुलताना यांनी आपण काँग्रेसचंच काम करत राहणार असल्याचं स्पष्ट केलं असलं, तरी त्यांनी राजीनामा देताना नवजोत सिंग सिद्धू यांचं नाव घेतलं आहे. त्यामुळे सिद्धू यांच्याच वाटेवरून सुलताना यांचीही वाटचाल राहण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री म्हणतात, “मला काहीच माहिती नाही”!
दरम्यान सिद्धू यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनीही प्रतिक्रिया दिली असून आपल्याला याबद्दल काही माहिती नसल्याचं म्हटलं. “सिद्धू आमचे प्रमुख आणि चांगले नेते आहेत. मी काय सांगणार जेव्हा मला काहीच माहिती नाही,” असं यावेळी ते म्हणाले. तसंच आपल्याला सिद्धू यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.