पंजाब काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू यांनी राजीनामा दिल्यानंतर आता त्यांचे सल्लागार मोहम्मद मुस्तफा यांनी मोठं विधान केलंय. नवज्योत सिंग सिद्धू हेच पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष राहतील आणि आगामी निवडणुकीत काँग्रेसचं नेतृत्व करतील, असं मत मुस्तफा यांनी व्यक्त केलंय. ते एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलत होते. विशेष म्हणजे सिद्धू आज (३० सप्टेंबर) दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचीही भेट घेणार असल्यानं हा वाद मिटवला जाईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी स्वतः पुढाकार घेत सिद्धू यांना फोन केला आणि वादाच्या नेमणुकांवर चर्चेची तयारी दाखवली होती. त्यामुळे आज चंदीगडमधील यावर पंजाब भवनात चन्नी आणि सिद्धू यांची भेट होईल. यात नेमणुकांवरील वादावर काय तोडगा निघतो आणि मुस्तफा यांच्या म्हणण्याप्रमाणे सिद्धू पुन्हा प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा हातात घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

“सिद्धू यांनी भावनेच्या भरात हा निर्णय घेतला, लवकरच प्रश्न सुटतील”

नवज्योत सिंग सिद्धू यांनी स्वतः ट्विट करत मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यासोबतच्या बैठकीची माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं, “मुख्यमंत्र्यांनी मला चर्चेसाठी बोलावलं आहे. आम्ही चंदीगडमधील पंजाब भवन येथे दुपारी ३ वाजता चर्चा करु. त्यांनी कोणत्याही विषयावरील चर्चेचं स्वागत केलं आहे.” सिद्धू यांनी भावनेच्या भरात हा निर्णय घेतला हे काँग्रेसच्या वरिष्ठांना समजत आहे. हे प्रश्न लवकरच सुटतील, असं मत सिद्धू यांचे सल्लागार मुस्तफा यांनी व्यक्त केलंय.

“पंजाबमधील घडामोडींमुळे पाकिस्तान खूश”

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मनिष तिवारी यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं कौतुक करत सध्याच्या राजकारणावरून नवज्योत सिंग सिद्धूवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला होता. पंजाबमध्ये सध्या जे काही होत आहे. यामुळे पाकिस्तान आणि आयएसआय खूश होत असल्याचं मनिष तिवारी यांनी म्हटलं होतं.

“पंजाबचा खासदार म्हणून पंजाबमध्ये होणाऱ्या घटनांमुळे दु:खी आहे. पंजाबमध्ये शांतता अत्यंत कठीण होती. १९८०-१९९५ मध्ये दहशतवाद्यांशी लढण्यासाठी आणि पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी २५ हजार लोकांनी बलिदान दिलं. त्यात सर्वाधिक काँग्रेस कार्यकर्ते होते”, असं मनिष तिवारी यांनी सांगितलं. “पंजाबमध्ये राजकिय स्थिरता पुर्नस्थापित करणं गरजेचं आहे. नुकताच मी प्रादेशिक सुरक्षा परिषदेतून परतलो आहे आणि त्यात असं दिसतंय की, पंजाबमधील अस्थिरतेबाबत पाकिस्तान जास्त आनंदी असेल. जर पंजाबमध्ये राजकीय अस्थिरता वाढली तर त्यांना पुन्हा आपला कट शिजवण्याची संधी मिळणार आहे”, असं मत मनिष तिवारी यांनी व्यक्त केलं होतं.

“पंजाबमधील घडामोडींमुळे पाकिस्तान खूश”; सिद्धू यांचं नाव न घेता मनिष तिवारींची टीका