गेल्या सहा महिन्यांपासून पतियाला सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्या तुरुंगातील वर्तनाविषयी नवी माहिती समोर आली आहे. सिद्धू यांच्या तुरुंगातील वर्तनाबाबत तुरुंग अधिकाऱ्यांनी सकारात्मक अहवाल दिला असून त्या आधारे त्यांची जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. १९८८मध्ये घडलेल्या एका प्रकरणामध्ये दोषी सिद्ध झाल्यानंतर सिद्धू यांना न्यायालयानं एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. पुढील वर्षी मे महिन्यात त्यांच्या शिक्षेचा कालावधी संपत असून चांगल्या वर्तनामुळे त्यांना जानेवारी महिन्यातच सोडण्यात येण्याची शक्यता आहे.
तुरुंगात सिद्धूंची ध्यानधारणा!
नवज्योतसिंग सिद्धू यांच्या वर्तनाविषयी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना एका तुरुंग अधिकाऱ्याने ते ध्यानधारणा करत असल्याचं सांगितलं. “नवज्योतसिंग सिद्धू यांच्याबाबत बोलायचं झालं, तर तुरुंगात आक्षेप घेण्यासारखं कोणतंही वर्तन त्यांच्याकडून केलं जात नाहीये. तसंही ते तुरुंगातला बराचसा काळ ध्यानधारणा करण्यात घालवतात”, असं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
विश्लेषण : नवज्योत सिंग सिद्धू यांना एक वर्षाचा तुरुंगवास; ३४ वर्ष जुनं प्रकरण नेमकं आहे तरी काय?
“पंजाब जेल नियमावलीनुसार, प्रत्येक कैद्याला त्याने तुरुंगात घालवलेल्या एका महिन्यासाठी चार दिवसांची सूट दिली जाते. जानेवारीपर्यंत घालवलेल्या आठ महिन्यांसाठी सिद्धू यांना अशी ३२ दिवसांची सूट मिळू शकणार आहे. याशिवाय प्रत्येक कैद्याला तुरुंग अधिकाऱ्यांकडून ३० दिवसांची सूट मिळू शकते. फक्त अतीगंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांना ही मिळत नाही. याव्यतिरिक्त डीजीपी(जेल) किंवा एडीजीपी(जेल) यांच्या विशेष परवानगीने कैद्याला ६० दिवसांची सूट मिळू शकते. पण यासाठी आधी मंत्रीमंडळाची मंजुरी घ्यावी लागते. त्यानंतर त्यावर राज्यपालांच्या परवानगीची मोहोर उमटवल्यानंतर ही सूट देण्यात येते”, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली.
…तर सिद्धू यांची होणार सुटका!
जर नवज्योतसिंग सिद्धू यांना या सर्व परवानग्या मिळाल्या, तर जानेवारी महिन्याच्या अखेरीसपर्यंत त्यांची तुरुंगातून सुटका होऊ शकते.