नुकताच संसदीय समितीचा लडाख दौरा झाला. यात शिवसेना खासदार संजय राऊत आणि अपक्ष खासदार नवनीत राणा दोघेही होते. या दौऱ्यातील राणा आणि राऊत यांचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्यावरून राज्यात कलगीतुरा आणि लडाखमध्ये सैर अशी टीकाही झाली. यावर पत्रकारांनी लडाखच्या मायनस तापमानात संजय राऊत तुमच्याशी काय बोलत होते असा सवाल करण्यात आला. यावर नवनीत राणा यांनी दिल्लीत प्रतिक्रिया दिली.

नवनीत राणा म्हणाल्या, “मला वाटते माझे विचार, माझी लढाई महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे. संजय राऊत कमिटीत आहे म्हणून मी लडाख दौऱ्यावर गेले नसते तर तो माझ्या कामावर अन्याय झाला असता. त्यामुळे विकासात मोठा अडथळा निर्माण झाला असता. माझी प्रगल्भता मोठी आहे आणि त्यातूनच मी संजय राऊत यांच्याशी वागले. त्यांच्यावर काही अत्याचार झालेले नाहीत, अत्याचार माझ्यावर झाले होते. तरीही मी माझी जबाबदारी घेऊन पूर्ण केली. माझी लढाई संपलेली नाही.”

“लडाख दौऱ्यात मी महाराष्ट्राची संस्कृती जपली”

“संजय राऊत आणि तुम्ही समोरासमोर आल्यावर काय बोलणं झालं या प्रश्नावर उत्तर देताना नवनीत राणा म्हणाल्या, “मी महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे आणि मी ती जपली. माझी विचारांची लढाई आहे, राजकीय लढाई आहे आणि महाराष्ट्राच्या हिताची लढाई आहे. जिथं महाराष्ट्राच्या हितासाठी काम होत नाही त्याविरोधात मी आवाज उठवणार आहे. मी संजय राऊतांवर जे बोलली ते आजही कायम आहे. बैठकीतील माझं बोलणं ही माझी प्रगल्भता आहे. ते संजय राऊत आहेत म्हणून मी जबाबदारी पार पाडलेली नाही.”

“संजय राऊतांवर अत्याचार झालेला नाही, आमच्यावर झालाय”

संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याच्या मुलांशीही संवाद केला. यावर राऊतांनी महाराष्ट्राची संस्कृती जपली का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नवनीत राणा म्हणाल्या, “संजय राऊत यांच्यावर अत्याचार झालेला नाही, अत्याचार आमच्यावर झाले आहेत. आम्हाला तुरुंगात पाठवण्यात आलं. १४ दिवस आम्ही तुरुंगात राहिलो. महाराष्ट्राची संस्कृती आणि प्रगल्भता आम्ही जपली, त्यांनी नाही.”

हेही वाचा : लीलावती रुग्णालयातील नवनीत राणांच्या ‘फोटो सेशन’वर काय कारवाई करणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

“एकट्या महिलेला पाहून अधिकार गाजवणारे काही लोक येथेच बसलेत”

“मी संजय राऊत यांना एक प्रश्न विचारला होता. एका मुलीने मला विचारलं होतं की महिलांना पुढे का येऊ दिलं जात नाही. मी म्हटलं मी अपक्ष म्हणून पुढे आले आहे. आपल्याला लढावं लागतं. मला एकटी पाहून महिलांवर अधिकार गाजवण्यासाठी येथेच काही लोक बसले आहेत. मी १४ दिवस तुरुंगवास भोगून आले आहे. मला तुरुंगात टाकणारे हेच लोक आहेत. त्यावर संजय राऊत यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. ते हसले,” असंही नवनीत राणा यांनी नमूद केलं.

Story img Loader