मुंबईतील दोन जुळ्या आयटी इंजिनियर बहिणींनी एकाच मांडवात एका तरुणाबरोबर विवाह केल्याची घटना सोलापुरातील अकलूज येथे समोर आली होती. पिंकी आणि रिंकी असे या दोन तरुणींचे नाव आहे. या जुळ्या बहिणींना मरेपर्यंत एकत्र राहायचे असल्याने त्यांनी एकाच तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर अतुल आवताडे या ट्रॅव्हल्स व्यवसाय असणाऱ्या तरुणाशी पिंकी आणि रिंकीने विवाह केला.
मात्र, याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर अतुलवर गुन्हा दाखल झाला होता. अतुलवर अदखलपात्र गुन्हा आणि राज्य महिला आयोगानेही त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, न्यायालयाने पोलिसांना या दाम्पत्याची चौकशीची परवानगी नाकारली होती. त्यामुळे पोलीस तपासाचा मार्ग बंद झाला होता.
पण, आता हा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्यात आला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी ही घटना हिंदू संस्कृतीला डाग असल्याचं लोकसभेत म्हटलं आहे. “महाराष्ट्रातील सोलापुरात एका घटनेने हिंदू संस्कृतीला डाग लावण्याचं काम केलं आहे. देशात कलम ४९५ आणि ४९५ लागू असताना एका तरुणाने दोन तरुणींशी विवाह केला आहे. मात्र, यासाठी देशात कायदा बनवण्याची गरज आहे. तसेच, हा विवाह करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. यामुळे येणाऱ्या काळात संस्कृतीला धक्का लागणार आहे,” असे नवनीत राणांनी बोलताना सांगितलं.
हेही वाचा : प्रेयसी म्हणाली लग्न करुया, त्याने गुजरातला नेऊन ४९ वेळा भोसकलं अन् त्यानंतर…; पोलीसही चक्रावले
काय आहे प्रकरण?
२ डिसेंबरला माळशिरस मधील अकलूजमध्ये हा विवाह झाला होता. पिंकी आणि रिंकी जुळ्या असल्याने लहानपणापासून लग्न करून एकाच घरी जायचं त्यांनी ठरवलं होतं. त्यांच्या कुटुंबाने या विवाहाला मान्यता दिली. त्यानंतर मुंबईत ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्या अतुल आवताडेशी जुळ्या बहिणांचा विवाह पार पडला होता.