माता विंध्यवासिनी.. नुसते नाव जरी उच्चारले तरी चित्त पुलकित होते. उत्तर भारतातील अतिप्राचीन विंध्याचल पर्वतरांगांमध्ये असलेल्या विंध्यांचल गावात माता विंध्यवासिनीचे अनादि काळापासून वास्तव्य आहे. गंगा नदीच्या तीरावर वसलेली विंध्यवासिनी महाराष्ट्रातील अनेकांची कुलदेवता आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, राजपूत, पाटील, तेली, कोळी, सोनार, आगरी यांच्या अनेक कुळांमध्ये विंध्यवासिनीची कुलस्वामिनी म्हणून उपासना केली जाते.
विंध्याचल पर्वत हा सर्वात प्राचीन पर्वत म्हणून गणला जातो. देवी भागवत ग्रंथात तर असे लिहिले आहे की, त्रेतायुगात भगवान श्रीरामचंद्राचे वास्तव्य येथे होते. द्वापार युगात मथुरेचा राजा कंस याने आपली बहीण देवकी आणि तिचा पती वासुदेव यांना बंदिशाळेत टाकले होते. कारण कंसाला असे समजले होते, की देवकीच्या पोटी येणारा आठवा गर्भ आपल्या नाशास कारणीभूत ठरणार आहे. वासुदेव – देवकी बंदिशाळेत असताना त्यांनी नारदाकरवी गर्गमुनींना बोलवून घेतले. त्यांच्या विनंतीनुसार गर्गमुनींनी विंध्याचल क्षेत्रावर गंगातटावर पारायण, लक्षचंडी यज्ञ सुरू केला. पूर्णाहूती होता क्षणी देवाने वरदान देऊन सांगितले की, मी देवकीच्या पुत्र रूपात अवतार घेत आहे, आणि माझी योगमाया गोकुळात यशोदेच्या कन्येच्या रूपात अवतीर्ण होईल. कृष्णरूपात मी कंसाचा वध करीन.
दुर्गा सप्तशती ग्रंथात अकराव्या अध्यायात म्हटले आहे की,
नंद गोप गृहे जाता यशोदा गर्भ संभवे।
ततस्तो नाश यष्यामी विंध्याचल निवासिनी।
नंद गावाच्या गवळ्याच्या घरी यशोदेपासून माझा गर्भसंभव होईल. ज्यावेळी मी जन्माला येईन, त्यावेळी माझे नाव विंध्याचल निवासिनी असे राहील.
श्रीमद्भागवतात वर्णन केल्यानुसार नुकत्याच जन्मलेल्या कृष्णाला घेऊन वासुदेव नंदाच्या घरी गेले. तेथे यशोदेला कृष्णाजवळ ठेवून, यशोदेच्या कुशीतून जन्माला आलेल्या कन्येला घेऊन मथुरेला आले आणि कंसाच्या ताब्यात दिले. त्यावेळी कंस त्या कन्येला मारण्यासाठी सरसावला. त्यावेळी ती दिव्य कन्या कंसाच्या हातून निसटली आणि आकाशात स्थिर झाली. तिने विराट रूप धारण केले. दिव्य माळा, रत्नमय अलंकारांनी ती विभूषित होती. धनुष्य-बाण, त्रिशूळ, ढाल, तलवार, शंख, चक्र, गदा ही आयुधे तिच्या अष्टभुजांमध्ये होती. आकाशात ती दिव्य तेजोमंडलाने व्यापली होती. सर्व दिशा प्रकाशमान होत असताना सर्व देवता, ऋषीमुनी, गंधर्व स्तवन करीत होते. देवीचे ते रूप वासुदेव – देवकीसाठी मात्र सौम्य आणि वरदायी होते, तर कंसासाठी साक्षात काळासमान दिसत होते. त्या योगमायेने आकाशवाणी केली, ‘‘अरे मूर्खा, तू काय मला मारशील? तुला मारणाारा तर दुसरीकडे जन्माला आला आहे.’’ असे बोलून देवी अंतर्धान पावली. आणि ती विंध्य पर्वतावर जाऊन स्थित झाली. या देवीला कृष्णाची बहीण अर्थात ‘कृष्णानुजा’ असेही संबोधले जाते.
उत्तर प्रदेशात मिर्झापूर या जिल्ह्य़ाच्या ठिकाणापासून साधारण आठ कि. मी. वर विंध्याचल गाव आहे. अतिशय निसर्गरम्य अशा या गावात गंगा नदीच्या काठी विंध्यवासिनीचे पुरातन मंदिर आहे. सिंहावर आरूढ असलेल्या माता विंध्यवासिनीच्या अष्टभुजा मूर्तीसमोर उभे राहताच मनात भक्तीभावासोबतच शक्तीभाव दाटून येतो. इसवी सनापूर्वीच्या काळात हिंदू मंदिरात एक छोटासा गाभारा बनवला जात असे. फारसा सुंदर नसलेला हा गाभारा म्हणजे मूर्तीचे गर्भगृह. त्यात मुख्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जात असे. त्याच्या समोरच अनेक खांब (स्तंभ) असलेल्या ओसरीचा भाग तयार केला जायचा. त्यानंतर गर्भगृहाच्या चारही बाजूंनी प्रदक्षिणा मारण्यासाठी ओसरीचा भाग तयार व्हायचा. या काळात मंदिराच्या सुशोभीकरणाचा विकास होऊ शकला नव्हता. त्यानंतरच्या गुप्तकाळात मंदिराचे शिखरासहित सुशोभीकरण होऊ लागले. मंदिराची सध्याची रचना पाहता, हे मंदिर निश्चितपणे इसवीसनापूर्वीचे आहे हे लक्षात येते. वरील दिलेली सर्व वैशिष्टय़े त्यात आढळतात. अतिशय छोटा गाभारा, त्यासमोर स्तंभ असलेली ओसरी, आणि लहान प्रदक्षिणा मार्ग. या मंदिरावर ना खूप कलाकुसर आहे, ना त्याला शिखर अथवा कळस आहे. अलीकडच्या काळात संगमरवर धातूचे पत्रे वगैरे लावून मंदिर थोडेफार सुशोभित केले आहे.
विंध्याचलाचा हा भाग गंगेच्या सुपीक खोऱ्यात येतो. काळातच्या ओघात येथील निसर्गसौंदर्य जरी आटलेले असले तरी, पर्यटनासाठी या भागात खूप धार्मिक स्थळे आहेत. चार – पाच कि. मी.च्या परिघात अष्टभुजा मंदिर, कालीखोह महाकाली मंदिर, रामेश्वर महादेव मंदिर आवर्जून भेट देण्यासारखे आहेत. तास-दीड तासाच्या अंतरावर वाराणसी, अलाहाबाद ही पवित्र स्थळेही आहेत.
मुंबई हावडा रेल्वे मार्गावर हे स्थान असल्यामुळे गाडय़ांची उपलब्धता खूप आहे. विंध्याचल स्टेशनवर गाडय़ा थांबत नसल्या, तरी आठ कि. मी. अंतरावरील मिर्झापूर येथे सर्व गाडय़ा थांबतात. विंध्याचल, मिर्झापूर येथे धर्मशाळा, हॉटेल्स वगैरे खूप आहेत. खरेदीसाठी चुंदरी (हातमागाच्या साडय़ा), हॅण्डलूमचे कपडे, दगडाच्या कोरीव मूर्ती येथे आहेत. उत्तर भारतातील केवळ हिंदूच नाही तर, इतर धर्मीयांसाठी पण हे पवित्र स्थळ आहे. नवरात्रात चैत्र पौर्णिमेला येथे भक्तांचा सागर उसळतो. म्हणून महाराष्ट्रातील पर्यटकांनी शक्यतो या काळात न जाणे योग्य.
विंध्यवासिनीची इतर काही स्थाने.
रत्नागिरी जिल्ह्य़ातील चिपळूण येथे विंध्यवासिनीचे एक पुरातन मंदिर आहे. इसवी सन १००० ते १२०० दरम्यानच्या काळातील अतिशय घोटीव आणि सुबक, रेखीव मूर्ती मंदिरात आहे. कोकण किनारपट्टीवरील चितळे, मोने, भाजे, प्रधान या अशा अनेक ब्राह्मण घराण्यांची ही कुलदेवता आहे. नैसर्गिक सौंदर्याची उधळण असलेल्या या परिसरातील तलाव, धबधबे भाविकांना भुरळ घालतात. पर्यटकांच्या आणि भक्तांच्या सोयीसाठी कुलस्वामिनी भक्तधाम येथे उभे राहिले आहे. माफक दरात घरगुती जेवण, चहा नाश्ता येथे उपलब्ध आहे. दरवर्षी माघ माहिन्यात येथे नवचंडी हवन केले जाते.
मुंबई आग्रा महामार्गावर मध्यप्रदेश सीमेवर सेंधवा गावात एक अतिशय प्राचीन स्थान आहे. येथे विंध्यवासिनी देवीला बिजासनी माता म्हणून ओळखले जाते. नाशिकपासून २५ कि. मी. अंतरावर िदडोरी येथे एका छोटय़ा टुमदार टेकडीवर माता विंध्यवासिनीचे दोनशे -तीनशे वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. अतिशय छोटय़ा गाभाऱ्यात ही मूर्ती स्थापित आहे. ही देवी िदडोरीची ग्रामदेवता आहे. गावातील लोक तिचा उल्लेख सोनारांची देवी असादेखील करतात.
१० वर्षांपूर्वी नाशिक आणि दिंडोरीतील काही कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी मंदिराच्या पुनर्निर्माणाचा संकल्प सोडला. मंदिराचे बांधकाम सुरू झाले. सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून या टेकडीवर हजारो झाडांची लागवड करण्यात आली. परिणामी येथील वातावरण खूपच आल्हाददायक झाले आहे. टेकडीवर मंदिरापर्यंत जाण्यासाठी थेट रस्ता तयार झाला आहे. अतिभव्य मंदिर, भक्त निवास, प्रसादालय, निसगरेपचार केंद्र यांचे काम प्रगतिपथावर आहे. साधारण वर्षभरात नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल. या भव्य मंदिरातील मूर्ती ही हुबेहूब विंध्याचल येथील मूळ मंदिरातील मूर्तीप्रमाणे असणार आहेत. येथे दर महिन्याच्या दुर्गाष्टमीला कुंकुमअर्चन केले जाते आणि कोणताही भक्त त्यात सहभागी होऊ शकतो. दर महिन्याच्या कोजागिरी पौर्णिमेला येथे यात्रा भरते आणि दिंडोरीच्या पंचक्रोशीतील भक्त येथे दर्शनासाठी गर्दी करतात.
सुनील शिरवाडकर – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा