Pahalgam Terror Attack Updates Today : नौदलात लेफ्टनंट म्हणून कार्यरत असलेल्या विनय नरवाल या २६ वर्षीय अधिकाऱ्याचा पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. विनय नरवाल हे मुळचे हरियाणाचे होते. जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये ते मारले गेले. सात दिवसांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. छोट्याश्या सुट्टीसाठी विनय नरवाल काश्मीरला पोहचले होते.

विनय नरवाल यांचा मृत्यू

सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी २६ वर्षीय विनय नरवाल यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. कोची या ठिकाणी त्यांचं पोस्टिंग होतं. १६ एप्रिलला त्यांचं लग्न झालं. त्यानंतर १९ एप्रिलला रिसेप्शन पार पडलं. यानंतर विनय नरवाल सुट्टीवर आले होते. काश्मीरमधल्या पहलगाम या ठिकाणी मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. दोन वर्षांपूर्वी विनय नरवाल यांनी नौदलात नोकरी स्वीकारली. त्यांचं पोस्टिंग कोची मध्ये होतं. विनय यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. त्यांचे कुटुंबीय अत्यंत दुःखात आहेत. त्यांच्या इतर नातेवाईकांनी, मित्रांनी तसंच शेजाऱ्यांनी घडलेल्या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे.

विनयच्या शेजाऱ्यांनी काय दिली माहिती?

विनय नरवाल यांचे शेजारी नरेश बन्सल यांनी ANI ला सांगितलं की विनय यांचं लग्न १६ एप्रिलला झालं होतं. त्यांच्या घरात अतिशय आनंदाचं वातावरण होतं. आता आम्हाला माहिती मिळाली आहे की विनय नरवाल यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. विनय नौदलात अधिकारी होता. त्याच्या मृत्यूने त्याचं कुटुंब शोकसागरात बुडालं आहे. आम्हालाही या घटनेवर विश्वासच बसत नाही. दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर हल्ला केला. या घटनेत २६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत देशभरात तीव्र संताप व्यक्त होतो आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

विनय नरवाल हे त्यांची पत्नी हिमांशी यांच्यासह मधुचंद्रासाठी काश्मीरला गेले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. हिमांशी यांनी सांगितलं की मी माझ्या पतीसह भेळ खात होते. त्यावेळी एक माणूस आला आणि त्याला विचारलं की तू मुस्लिम आहेस का? त्यावर विनय नाही म्हणाला. ज्यानंतर त्या दहशतवाद्याने विनयवर गोळ्या झाडल्या. विनय नरवाल यांनी लग्नासाठी ४० दिवसांची सुट्टी घेतली होती. १६ एप्रिलला विनय आणि हिमांशी यांचं लग्न झालं. त्यानंतर २० एप्रिलला विमानाने हिमांशी आणि विनय काश्मीरला आले होते. २२ एप्रिल रोजी विनय नरवाल यांना दहशतवाद्यांनी ठार केलं.

मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातले ६ जण मारले गेले आहेत. पुणे, डोंबिवली, पनवेल या ठिकाणी वास्तव्य करणारे हे पर्यटक होते. दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. दरम्यान २६ वर्षीय विनय नरवाल यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.