काही महिन्यांपूर्वी योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबाद या शहराचं नाव बदलून प्रयागराज केलं होतं. सर्व सरकारी दस्तऐवजांमध्ये देखील तसे बदल करण्यात येत आहेत. मात्र, या सगळ्या प्रकारामध्ये एक अजबच प्रकार उत्तर प्रदेश सरकारने केला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी खोचक ट्वीट करत उत्तर प्रदेश सरकारवर आणि पर्यायाने भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच, या ट्वीटमध्ये त्यांनी सुप्रसिद्ध गजलकार कवी अकबर इलाहाबादी यांचा एक शेर देखील पोस्ट केला आहे. त्यांच्या या ट्वीटवरून नवी चर्चा सुरू झाली आहे.

अलाहाबाद शहराचं नाव बदलून प्रयागराज करण्याला काही महिने लोटले असले, तरी अजूनही नवीन नाव लोकांच्या अंगवळणी पडायचं आहे. पण शहरांची नावं जरी बदलली, तरी त्या शहरांच्या नावांवरून पडलेली लोकांची नावं देखील बदलणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. याच मुद्द्यावरून नवाब मलिक यांनी खोचक ट्वीट केलं आहे.

या ट्वीटमध्ये अकबर इलाहाबादी यांचा एक शेर ट्वीट करत नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. “अकबर इलाहाबादी नहीं, अब प्रयागराजी कहिए…हद कर दी..कहां कहां बदलोगे?” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

अकबर इलाहाबादी यांचा शेर..

दरम्यान, या ट्वीटसोबत नवाब मलिक यांनी अकबर इलाहाबादी यांचा एक सुप्रसिद्ध शेर देखील शेअर केला आहे. “कौम के गम में डिनर खाते हैं हुक्काम के साथ, रंज लीडर को बहुत है मगर, आराम के साथ..अकबर इलाहाबादी” असं या ट्वीटमध्ये नवाब मलिक यांनी लिहिलं आहे.

नेमकं झालंय काय?

उत्तर प्रदेश उच्च शिक्षण सेवा आयोगाच्या (UPHESC) वेबसाईटवर चक्क काही प्रसिद्ध कवींची आडनावंच बदलण्यात आली आहे. त्यांचं आडनाव ‘इलाहाबादी’ ऐवजी ‘प्रयागराज’ असं लिहिण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होता आहे. वेबसाईटवरील अलाहाबाद ‘About Allahabad’ विभागात प्रसिद्ध कवी अकबर इलाहाबादी, तेग इलाहाबादी आणि राशीद इलाहाबादी यांची आडनावं बदलण्यात आली असून अकबर प्रयागराज, तेग प्रयागराज आणि राशीद प्रयागराज असा उल्लेख करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशात शहरानंतर कवींची आडनावंपण बदलली; ‘अलाहाबादी’ ऐवजी ‘प्रयागराज’ उल्लेख; संतापाची लाट

दरम्यान, या प्रकारानंतर शहराच्या नावासोबतच व्यक्तींची नावं देखील बदलतील का? अशी एक नवीच चर्चा सुरू होताना दिसू लागली आहे.

Story img Loader