रेमंड ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी घटस्फोटाची घोषणा X या सोशल मीडिया साईटवरुन केली. अशात आता गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या पत्नीला म्हणजेच नवाज मोदी यांना दिवाळी पार्टीच्या दिवशी घरात येण्यापासून रोखलं आहे.ज्यानंतर ठाण्यातल्या रस्त्यावर हंगामा पाहण्यास मिळाला आहे. या संदर्भातला व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या दोघांचं भांडण चव्हाट्यावर आलं आहे.
दिवाळीची पार्टी असल्याने त्यात सहभागी होण्यासाठी नवाज मोदी आल्या होत्या. मात्र त्यांना रेमंड स्टेट या ठिकाणी बंगल्याबाहेरच थांबवण्यात आलं. सुरक्षा रक्षकांनी नवाज मोदी यांना आतमध्ये जाऊ दिलं नाही. त्यानंतर त्यांनी तिथेच बसत धरणं धरलं. मला पार्टीला बोलवलं आहे आणि आता आत जाऊ दिलं जात नाही असा आरोप त्यांनी केला.
ट्रेड अॅनालिस्ट कमाल आर खानने ही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसंच गौतम सिंघानिया त्याच्या पत्नीला कशी वागणूक देतो हे तुम्हीच पाहा असंही म्हटलं आहे. एवढंच नाही काही वर्षांपूर्वी गौतम सिंघानियांनी आपल्या वडिलांनाही असंच हाकलून दिल्याचंही कमाल खानने म्हटलं आहे.
नवाज मोदी आणि गौतम सिंघानिया यांचं ३२ वर्षांचं नातं संपुष्टात आलं आहे. कारण मी नवाजपासून विभक्त होतो आहे असं गौतम सिंघानिया यांनी X पोस्ट करुन जाहीर केलं. नवाज मोदी आणि गौतम सिंघानिया यांनी १९९९ मध्ये लग्न केलं. त्याआधी आठ वर्षे ते लिव्ह इन मध्ये राहात होते. मात्र त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला.
गौतम सिंघानिया हे काही वर्षांपूर्वी वडील विजयपत सिंघानिया यांच्याशी झालेल्या वादामुळेही चर्चेत आले होते. विजयपत सिंघानिया यांनी रेमंड समूह स्थापन केला. रेमंड हा कापड उद्योगातील एक नावाजलेला ब्रांड आहे. मात्र विजयपत सिंघानिया आणि गौतम सिंघानिया यांचंही भांडण झालं होतं. गौतम सिंघानियांनी वडील विजयपत सिंघानिया यांना घराबाहेर हाकलून दिल्याचेही आरोप झाले होते. जे चव्हाट्यावर आलं होतं. त्यानंतर आता त्यांच्या पत्नीने रस्त्यावर उतरुन धरणं धरलं होतं.