Pakistan Election 2024 Result : पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झाल्याचा दावा माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केला आहे. तसंच, त्यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग (N) हा देशातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. परंतु, या सरकारकडे सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत नसल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केलं आहे.
“आमच्याकडे स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत नाही. त्यामुळे आम्ही इतर पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करू”, असे ते म्हणाले. युती सरकारच्या स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टीचे खासदार आसिफ अली झरदारी आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (एफ) चे मौलाना फजलुर रहमान यांच्याशी संपर्क साधला जाईल, असेही ते म्हणाले.
नवाझ शरीफ म्हणाले की, त्यांचा मुलगा शहबाज शरीफ पक्षाच्या वतीने आसिफ अली आणि मौलाना फजलूर यांच्याशी चर्चा करणार आहे. “आम्ही पुन्हा पुन्हा निवडणुका घेऊ शकत नाही. आम्ही सर्व काल एकत्र बसलो होतो पण निकाल लागला नाही म्हणून तुम्हाला संबोधित केले नाही”, असंही ते म्हणाले.नवाझ शरीफ म्हणाले, “आम्ही आज सर्वांना या पाकिस्तानची पुनर्बांधणी करण्यासाठी आमंत्रित करत आहोत.”
हेही वाचा >> विश्लेषण : इम्रान यांच्या ‘बाउन्सर’समोर पाकिस्तानी लष्कर, शरीफ-भुत्तो हैराण? निवडणुकीत अनपेक्षित मुसंडी कशी?
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या (ECP) डेटावरून असे दिसून आले आहे की १३९ मतदारसंघांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ज्यात ५६ अपक्ष (PTI समर्थक), PML-N ४३, PPP २६ आणि अपक्षांचा समावेश आहे. सरकार स्थापन करण्यासाठी २६५ जागांपैकी १३३ जागा जिंकणे आवश्यक आहे.
इम्रान यांचे पीटीआय-समर्थक उमेदवार आघाडीवर?
इम्रान खान यांच्यावर दहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. विविध प्रकरणांमध्ये दोषी ठरल्यामुळे ते सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्या पक्षासही निवडणूक लढवण्यापासून मज्जाव करण्यात आला आणि ‘बॅट’ या पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठवण्यात आले. त्यामुळे पक्षातील अनेक नेते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. रात्री आठ वाजेपर्यंत जाहीर झालेल्या १३४ जागांपैकी पीटीआय समर्थित उमेदवार ५६ जागांवर विजयी झाले होते. पीएमएल (एन) ४३ जागांवर आणि पीपीपी २६ जागांवर विजयी झाले. इतर विजयी उमेदवारांची संख्या ८ होती. मावळत्या नॅशनल असेम्ब्लीत पीएमएल (एन) आणि पीपीपी यांची आघाडी होती. नवीन असेम्ब्लीतही त्यांना आघाडी करावी लागू शकते. कारण १३३ हा पूर्ण बहुमताचा आकडा गाठण्याच्या स्थितीत कोणताच पक्ष रात्रीपर्यंत तरी नव्हता.