संयुक्त राष्ट्रे आमसभेत उर्दूऐवजी इंग्रजीतून भाषण केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना न्यायालयाचा अवमान केल्याच्या खटल्यास सामोरे जावे लागणार आहे.
पाकिस्तानच्या घटनेतील २५१ कलमानुसार उर्दूला अधिकृत भाषेचा दर्जा देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असा आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात सरकारला दिला होता. मात्र शरीफ यांनी आमसभेत इंग्रजीतून भाषण केल्याने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानातील नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी इंग्रजीऐवजी उर्दू भाषेचा वापर करावा, असेही न्यायालयाने म्हटले होते. पाकिस्तानातील मध्यवर्ती आणि प्रांतिक सरकारांनी अधिकृत कामासाठी उर्दू भाषेचा विनाविलंब वापर करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ८ सप्टेंबर रोजी दिला होता. त्याचे शरीफ यांनी उल्लंघन केल्याचे याचिकाकर्ते झाहीद घनी यांनी म्हटल्याचे ‘द डॉन’ने म्हटले आहे.
रशियाचे अध्यक्ष पुतिन, चीनचे अध्यक्ष जिनपिंग, जपानचे अध्यक्ष अबे, भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, क्यूबाचे अध्यक्ष कॅस्ट्रो, इराणचे अध्यक्ष रौहानी आणि उक्रेनचे अध्यक्ष पोरोशेन्को यांनी आमसभेत त्यांच्या राष्ट्रीय भाषेतून भाषणे केली, असे घनी यांनी म्हटले आहे.