पाकिस्तान मुस्लिम लीग (एन)चे नवाझ शरीफ यांची बुधवारी औपचारिकपणे पाकिस्तानच्या संसदेमध्ये पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. 
नवाझ शरीफ यांनी याआधी दोन वेळा पंतप्रधानपद भूषविले होते. मागील दोन्ही वेळेला त्यांना पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करता आला नव्हता. यंदा मात्र ते त्यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाल पूर्ण करतील, अशी अपेक्षा आहे. गेल्याच महिन्यात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शरीफ यांच्या पक्षाला जनतेने बहुमताने निवडून दिले आहे.
११ मे रोजी झालेल्या निवडणुकीत शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) पक्षाला ३४२ पैकी १८० हून अधिक जागांवर यश मिळाले. सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टी व माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ या दोन्ही पक्षांना पाकिस्तानी जनतेने नाकारले. या सर्व पार्श्वभूमीवर नवाझ शरीफ तिसऱ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर आरूढ होत आहेत.

Story img Loader