पठाणकोट हल्ल्याबाबत भारताने पुरवलेल्या माहितीवर कारवाई

पठाणकोट हल्ल्याबाबत भारताने जी माहिती पुरवली आहे, तिच्या आधारे या हल्ल्याचा तपास करण्याचे आदेश पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिल्याचे वृत्त पाकिस्तानच्या एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे.

शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी एक उच्चस्तरीय बैठक होऊन तीत भारतीय हवाई तळावरील हल्ल्याबाबत चर्चा करण्यात आली, असे वृत्त ‘दि नेशन’ने दिले आहे. भारताने दिलेले पुरावे पुढील कारवाईसाठी गुप्तचर विभागाचे प्रमुख आफताब सुलतान यांना सोपवण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दहशतवाद प्रतिबंधक उपाययोजनांचा भाग म्हणून, आपला शेजारी देश असलेल्या भारताशी सहकार्य वाढवण्यास पाकिस्तान तयार असल्याचे शरीफ यांनी या बैठकीत बोलताना सांगितले. हल्ल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान सुरू झालेली संवाद प्रक्रिया सुरळीत राखण्यासाठी आपले समपदस्थ अजित डोवाल यांच्याशी संपर्कात राहावे, असे निर्देश शरीफ यांनी पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासीर खान यांना दिले. भारताने दिलेली माहिती ‘अपुरी’ असून पाकिस्तान भारताला अधिक माहिती मागू शकतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पारदर्शक तपासासाठी अमेरिकेचा पाकवर दबाव

पठाणकोट येथील वायुसेनेच्या तळावर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक देशांनी भारताला दहशतवादविरोधी मोहिमेसाठी पाठिंबा दिला आहे. पाकिस्तानने या हल्ल्याचा ‘संपूर्ण, निष्पक्ष आणि पारदर्शक’ तपास करावा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच या तपासाची निष्पत्ती आम्ही बघू इच्छितो, असे सांगून अमेरिकेने पाकिस्तानवरील दबाव वाढवला आहे. पाकिस्तानने तपासाची प्रक्रिया संपूर्णपणे, निष्पक्षपणे आणि पारदर्शकरीत्या करावी असे आम्हाला नक्कीच वाटते, असे अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किरबी म्हणाले.

पठाणकोट तळावरील शोधमोहीम पूर्ण

पठाणकोट येथील वायुसेनेच्या तळावर सहा अतिरेक्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सात दिवसांनंतर हा विस्तीर्ण परिसर पिंजून काढण्याची मोहीम शुक्रवारी पूर्ण झाली. मात्र, दोन दिवसांपूर्वी लष्करी गणवेशातील दोघे या भागात दिसल्याची माहिती मिळाल्यामुळे पठाणकोट व गुरुदासपूर या दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

सहा दहशतवाद्यांना मारण्यात आल्यापासून गेले तीन दिवस सुरू असलेले वायुसेनेच्या तळावरील ‘कोम्बिंग ऑपरेशन’ संपले असून, हा संपूर्ण परिसर दहशतवाद्यांपासून मुक्त करण्यात आला आहे, असे वायुसेनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

एखादा दहशतवादी लपून तर बसलेला नाही, याची खातरजमा करण्यासाठी लष्कर, एनएसजी आणि वायुसेनेचे गरुड कमांडोज यांनी संयुक्तरीत्या ही मोहीम राबवली.

Story img Loader