राजकीय क्षेत्रातील देवाणघेवाण, भेटी देणे-घेणे यामागे काही विशिष्ट हेतू असतात, मुत्सद्दीपणाही दडलेला असतो. मात्र परस्परांना भेटी देत यापलीकडे जाऊन करण्यात आलेले प्रयत्न म्हणूनच लक्षणीय ठरतात. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी अलीकडेच भारतात आले असता मोदी यांनी शरीफ यांच्या मातेसाठी एक शाल भेटीदाखल पाठविली होती. शरीफ यांनीही आता मोदी यांच्या आईसाठी एक साडी पाठवून आपली सदिच्छा प्रकट केली आहे.
नरेंद्र मोदी यांनी या सदिच्छेबद्दल शरीफ यांचे मनापासून आभार मानले आणि शरीफ यांनी पाठविलेली साडी लवकरच आपल्या आईकडे पाठवून देऊ, असे सांगितले. नवाझ शरीफजींनी आपल्या आईसाठी खरोखरच एक सुंदर साडी पाठविली आहे, असे मोदी यांनी आग्रहपूर्वक नमूद केले.
मोदी यांच्या शपथविधीप्रसंगी उभय नेत्यांची भेट झाली, तेव्हा त्यांच्यात काहीसे भावपूर्ण संभाषणही झाले होते. आपल्या आईने आपल्याला मिठाई दिल्याचे दूरचित्रवाणीवरून बघितल्यानंतर शरीफ हलले होते, असे मोदी यांनी त्या वेळी ट्विट केले होते. आपली आईही हे बघून भावुक झाली होती, असेही शरीफ यांनी मोदी यांना आवर्जून सांगितले होते.
नवाझ शरीफ यांच्याकडून मोदी यांच्या आईला साडीची भेट
राजकीय क्षेत्रातील देवाणघेवाण, भेटी देणे-घेणे यामागे काही विशिष्ट हेतू असतात, मुत्सद्दीपणाही दडलेला असतो.
First published on: 06-06-2014 at 03:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawaz sharif gifts narendra modis mother a sari