देशाचे होऊ घातलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता होणाऱया शपथविधी कार्यक्रमासाठी भाजपने जवळपास ३ हजार पाहुण्यांना निमंत्रित केले आहे. यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचाही समावेश असल्याचेही समजते
सार्क देशांच्या पंतप्रधानांना या शपथविधी कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी आमंत्रित करणार असल्याचे समजते. त्यामुळे सार्क मध्ये समाविष्ट असलेल्या पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ या देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. सार्कमध्ये पाकिस्तानचाही समावेश असल्याने नवाझ शरीफ यांनाही मोदी बोलाविण्याची शक्यता आहे. परंतु, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवाझ शरीफ आणि बांगलादेशचे पंतप्रधान आपल्या प्रतिनिधींना शपथविधी कार्यक्रमाला पाठविणार असल्याचे म्हटले जात आहे.
याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून नवाझ शरीफ यांनी तिसऱयांदा शपथ घेतली त्यावेळी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यंनी हजेरी लावली नव्हती. तसेच सध्या भारताच्या सीमेवर झालेल्या हल्ल्यांमुळे दोन्ही राष्ट्रांत तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे नवाझ शरीफ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? याकडे लक्ष लागून राहीले आहे.