काश्मीरसंदर्भात सर्वसमावेशक तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याकडून भारताला चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या विधानसभेतील संयुक्त सत्रात बोलताना भारताला यासंदर्भातील चर्चेसाठी निमंत्रण दिल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीरमधील जनतेच्या भावनांचा विचार करता काश्मीर प्रश्न निकाली निघेपर्यंत या प्रदेशाभोवती गैरसमज आणि दबावाचा विळखा कायम राहील, असे ते म्हणाले. आपल्या बोलण्यात त्यांनी काश्मीर प्रश्न लवकरात लवकर निकालात निघावा, यावर भर दिला. दहशतवादी हल्ल्यांप्रकरणी भारताला हवा असणारा सय्यद हाफीज स्वतःच्या संघटनेच्या माध्यमातून पाकिस्तानातील विविध शहरांत काश्मीरप्रश्नावरून निदर्शने घडवून आणत आहे. भारतीय जवानांची हत्या तसेच नियंत्रण रेषेलगत होणा-या गोळीबारामुळे उभय देशांतील संबंध ताणले गेले आहेत. या प्रश्नाचे गांभीर्य़ ओळखून भारत चर्चेच्या प्रस्तावावर योग्य पाऊल उचलेल, असा आशावाद यावेळी नवाज शरीफ यांनी व्यक्त केला. तसेच दोन्ही बाजूकडील लोकांचा त्रास कमी करण्यासाठी पाकिस्तानकडून अनेकदा ठोस पावले उचलली गेली असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader