पीटीआय, इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ चार वर्षांनंतर पुढील महिन्यात ब्रिटनमधून पाकिस्तानमध्ये परतण्याची शक्यता आहे. एका वृत्तपत्रामध्ये शनिवारी यासंबंधी वृत्त देण्यात आले आहे. शरीफ हे पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. लंडनमधील एका बैठकीला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांने दिलेल्या माहितीच्या आधारे ‘डॉन’ने शरीफ यांच्या संदर्भात वृत्त दिले आहे. यामध्ये शरीफ यांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे, असे नमूद केले आहे. मात्र, त्यांनी निश्चित तारीख जाहीर केली नाही, असेही वृत्तात म्हटले आहे.
शरीफ हे नोव्हेंबर २०१९ पासून लंडनमध्ये राहत आहेत. अल-अझिझिया मिल्स आणि एव्हनफिल्ड भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना २०१८ मध्ये दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर अल-अझिझिया प्रकरणात लाहोरमधील कारागृहात सात वर्षांची शिक्षा भोगत असताना त्यांना २०१९ मध्ये प्रकृतीच्या कारणांमुळे लंडनमध्ये जाण्यास परवानगी देण्यात आली होती.