अटीतटीच्या ठरलेल्या पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत कोणालाच बहुमत मिळालेले नाही. परंतु, पाकिस्तान मुस्लिम लीग (PML-N) या पक्षाने इतर अपक्षांसह सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. परंतु या घडामोडीत एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. निवडणूक प्रचारात स्वतःला पंतप्रधान म्हणून घोषित केलेल्या नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून माघार घेतली असून त्यांच्या पक्षाकडून माजी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचं नाव पुढे करण्यात आलं आहे. शेहबाज शरीफ हे नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू आहेत. पीएमएल(एन) पक्षाच्या प्रवक्त्या मरियम औरंगजेब यांनी एक्सद्वारे ही माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“नवाझ शरीफ यांनी पीएमएल-एन (आगामी सरकार स्थापन करण्यासाठी) ला पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांचे आभार मानले आहेत आणि अशा निर्णयांमुळे पाकिस्तान संकटातून बाहेर येईल, अशी आशा व्यक्त केली आहे”, असं मरियम औरंगजेब म्हणाल्या.

हेही वाचा >> “मोदींनी नव्हे, कतारमधील भारतीयांना शाहरुखने सोडवलं”, भाजपा नेत्याचा दावा; किंग खानच्या कार्यालयाने केला खुलासा

८ फेब्रुवारीला पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर बऱ्याच गोंधळानंतर मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. मतमोजणीत कोणालाच स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. नवाझ शरीफ यांचा पीएमएल(एन), बिलावल भुट्टो यांचा पीपीपी आणि तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थक (पीटीआय) या तीन पक्षांत सार्वत्रिक निवडणुकीची खरी लढत झाली. परंतु, या तिघांपैकी कोणालाची स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सत्तास्थापनेचा दावा कोण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, पीएमएमल (एन) पक्षाची पीपीपीच्या बिलावल भुट्टो यांच्या पक्षाबरोबर युतीची चर्चा सुरू होती. या दोन्ही पक्षांत अनेक बैठका झाल्याचंही सांगण्यात येतंय. तसंच, बिलावल भुट्टोही पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होते. त्यामुळे बिलावल भुट्टोंच्या सहकार्याने सरकार स्थापन झालं तर पंतप्रधान कोण असणार हा मोठा प्रश्न होता.परंतु, बिलावल भुट्टो यांनी आयत्या वेळी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून माघार घेतली.

बिलावल भुट्टोंच्या नेतृत्वाखाली झालेल्या पीपीपीच्या उच्चाधिकारी केंद्रीय कार्यकारी समितीच्या (सीईसी) बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना बिलावल म्हणाले की, आमच्या पक्षाला संघीय सरकार स्थापन करण्याचा अधिकार नाही हे वास्तव आहे. यामुळे, मी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी स्वत: ला पुढे करणार नाही.” तसंच, सत्तास्थापनेसाठी पीएमएल (एन) पक्षाला पाठिंबा देत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. एवढंच नव्हे तर पीएमएल (एन) पक्षाला पाकिस्तानी लष्कराचाही पाठिंबा आहे.

नवाज शरीफ यांचे धाकटे बंधू आणि माजी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनीही नवाझ शरीफच पुन्हा एकदा पंतप्रधान पदी विराजमान होतील, असा दावा केला होता. “नवाज शरीफ चौथ्यांदा पंतप्रधान होतील, असं मी म्हटलं होतं. आणि आजही ते चौथ्यांदा पंतप्रधान होणार आहेत”, असं शेहबाज यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. शहबाज म्हणाले की मी बिलावल आणि त्यांचे वडील आसिफ अली झरदारी यांच्याशी चर्चा केली असून पाठिंब्यासाठी त्यांचे आभारही मानले आहेत.

“आम्हाला आशा आहे की आम्ही एकत्रितपणे पाकिस्तानला सर्व राजकीय आणि आर्थिक संकटातून बाहेर काढू शकू, इंशाअल्ला,” असं शहबाज एक्स पोस्टवर म्हणाले. पीएमएल-एन आणि मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट-पाकिस्तान (एमक्यूएम-पी) यांनीही मंगळवारी सरकार स्थापनेबाबत बैठक घेतली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawaz sharif nominates brother shehbaz as pakistan pm candidate sgk