इमरान खान यांचा पक्ष भ्रष्टाचारविरोधी मोर्चे काढणार

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे नाव पनामा पेपर्समध्ये आले असून त्यांनी तीन मुलांच्या नावाने परदेशात अवैध संपत्ती जमवली आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते इमरान खान यांनी केली आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात देशव्यापी आंदोलन सुरू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तान तहरीक ए इन्साफ या पक्षाचे प्रमुख असलेल्या इमरान खान यांनी इस्लामाबाद येथे पक्षाच्या विसाव्या स्थापना दिनानिमित्त जाहीर सभा घेतली. त्यात त्यांनी सांगितले, की मियाँसाहिब तुम्ही आता राजीनामा दिला पाहिजे.

मंगळवारपासून सिंध येथे भ्रष्टाचारविरोधी मोर्चा काढणार असून त्यानंतर लाहोर येथेही मोठा मोर्चा काढला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शरीफ यांनी त्यांच्या कुटुंबीयांविरोधात व पनामा पेपर्समधील नावे आलेल्यांच्या विरोधात जो चौकशी आयोग नेमला आहे, तो इमरान खान यांनी फेटाळला आहे.

२०१४ मध्ये खान यांनी शरीफ यांच्या विरोधात निवडणूक घोटाळा प्रकरणी इस्लामाबादेत निषेध आंदोलने करून त्यांना जेरीस आणले होते. इमरान खान यांनी सांगितले, की देशातील वाढत्या भ्रष्टाचारामुळे वीस वर्षांपूर्वी मी पक्ष स्थापन केला. अजून भ्रष्टाचार संपलेला नाही त्यामुळे आणखी वीस वर्षे झगडण्याची माझी तयारी आहे. अल्पसंख्याकांच्या व महिलांच्या हक्कांचा सन्मान करा, असे त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना एका शीख नेत्याचा खून झाल्याच्या पाश्र्वभूमीवर सांगितले.

Story img Loader