जम्मू-काश्मीरमधील पूंछ भागात पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पाच भारतीय जवान शहीद झाल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे. या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी गुरुवारी येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात तातडीने वरिष्ठ लष्करी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन चर्चा केली. नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबारात पाच भारतीय जवान शहीद झाल्याबद्दल शरीफ यांनी दु:ख व्यक्त केले. तसेच दोन्ही देशांमधील तणाव कमी होऊन संबंध सुधारावेत यासाठी भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पुढील महिन्यात न्यूयॉर्क येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेदरम्यान भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या उच्चस्तरीय बैठकीला लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अझिझ आदी उपस्थित असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मंगळवारी पूंछ भागातील नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून केलेल्या गोळीबारात पाच भारतीय जवान शहीद झाल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. या पाश्र्वभूमीवर सौदी अरेबियाच्या खाजगी दौऱ्यावरून परतल्यानंतर शरीफ यांनी प्रथमच उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत नियंत्रणरेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांनी सकारात्मक पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच पाकिस्तान लष्करी आणि राजकीय स्तरावर भारताशी सुसंवाद साधू इच्छितो, असेही शरीफ यांनी यावेळी स्पष्ट केले.
८ जानेवारी पूंछ भागात पाकिस्तानी लष्कराकडून भारतीय जवानाची हत्या करून धडापासून शीर वेगळे केल्याच्या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढून चर्चेची प्रक्रिया थांबली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा