पाकिस्तानी तालिबान्यांविरोधात लष्करी कारवाईच्या पाश्र्वभूमीवर तालिबान्यांसमवेत बोलणी करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेण्याचा निर्णय पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी सोमवारी जाहीर केला.
पाकिस्तानातील सुरक्षा परिस्थिती आणि अन्य राष्ट्रीय मुद्दय़ांवर विचार करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या सत्तारूढ पाकिस्तान मुस्लीम लीगच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलताना शरीफ यांनी हे संकेत दिले. तालिबान्यांसमवेत चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे मत विचारात घेतले जावे, असे मत शरीफ यांनी मांडल्याचे वृत्त ‘जीओ न्यूज’ या वाहिनीच्या संकेतस्थळावरून देण्यात आले आहे. सरकारच्या पुढील कृती योजनेसंदर्भात राजकीय पक्षांना विश्वासात घेण्यासंबंधीचा निर्णयही या बैठकीमध्ये घेण्यात आला. मात्र पाकिस्तानातील ‘तेहरीक-ए-तालिबान’ या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेविरोधात हल्ले सुरू असतानाच त्यांच्या विरोधातील कारवाई स्थगित करावी किंवा त्यांच्यासमवेत चर्चा करण्यासंबंधी या बैठकीमध्ये कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. दहशतवादी कृत्यांसाठी पाकिस्तानच्या भूमीचा वापर केला जाऊ नये, असेही शरीफ यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अलीखान यांनी लोकप्रतिनिधींना देशाच्या सुरक्षा परिस्थितीची माहिती दिली. तालिबान्यांनी चर्चेचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला आहे, असेही ते म्हणाले. तालिबान्यांसमवेत चर्चा करणे किंवा त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासंबंधीचा निर्णय पंतप्रधान नवाझ शरीफ आणि देशाच्या नेतृत्वाने घ्यावयाचा आहे. मात्र तालिबान्यांवर आपला विश्वास नाही. कारण एकीकडे ते चर्चेची मागणी करतात आणि दुसरीकडे निरपराध लोकांना ठार मारीत असतात, असे मत अलीखान यांनी व्यक्त केले.

Story img Loader