मंत्रिमंडळाचा आकार मात्र छोटेखानीच
पाकिस्तानचे पंतप्रधानपद दोनदा भूषवणारे नवाझ शरीफ आज, बुधवारी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. मागील दोन्ही वेळेला त्यांना पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करता आला नव्हता. यंदा मात्र ते त्यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाल पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. गेल्याच महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शरीफ यांच्या पक्षाला जनतेने बहुमताने निवडून दिले आहे.
११ मे रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) पक्षाला ३४२ पैकी १८० हून अधिक जागांवर यश मिळाले. सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टी व माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ या दोन्ही पक्षांना पाकिस्तानी जनतेने नाकारले.
या सर्व पाश्र्वभूमीवर नवाझ शरीफ तिसऱ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर आरूढ होत आहेत. साध्या समारंभात ते आज पदाची शपथ घेतील. त्यांचे मंत्रिमंडळही छोटेखानीच असेल. रमजाननंतर मंत्रिमंडळाचा आकार विस्तारणार असला तरी मंत्र्यांची संख्या फार नसेल असे शरीफ यांच्या निकटच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पक्षातील विश्वासू सहकाऱ्यांकडे महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्याच्या मानसिकतेत शरीफ असल्याचे बोलले जाते.
देशाची खालावलेल्या अर्थव्यवस्थेचा विचार करता काटकसरीचा उपाय म्हणून शरीफ मंत्रिमंडळाचा आकार छोटा असेल असे पक्षाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. सुरुवातीला आठ-दहाच सदस्य असतील व रमजाननंतर आणखी पाच-सहा जणांचा त्यात समावेश करण्यात येणार आहे.
संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार ही दोन महत्त्वाची खाती शरीफ स्वतकडेच ठेवतील असे जाणकारांचे मत आहे. आज, संसदेत शरीफ पंतप्रधानपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करतील. इशाक दार, ख्वाजा आसिफ व अब्दुल कादिर बलुच हे नेते शरीफ यांच्या नावाची शिफारस करतील. पक्ष त्यावर शिक्कामोर्तब करेल व त्यानंतर शरीफ पंतप्रधानपदाची शपथ घेतील. शरीफ यांच्याविरोधात पाकिस्तानी पीपल्स पार्टीचे उमेदवार व माजी पंतप्रधान मखदूम अमिन फहीम व पाकिस्तान तेहरीक ए इन्साफचे नेते जावेद हाश्मी हे उमेदवार उभे ठाकणार आहेत. मात्र, पाकिस्तान मुस्लिम लीगला बहुमत असल्याने शरीफ यांचीच सरशी होणे निश्चित आहे.
नवाझ शरीफ यांचा आज शपथविधी
पाकिस्तानचे पंतप्रधानपद दोनदा भूषवणारे नवाझ शरीफ आज, बुधवारी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. मागील दोन्ही वेळेला त्यांना पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करता आला नव्हता. यंदा मात्र ते त्यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाल पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे.
First published on: 05-06-2013 at 05:41 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawaz sharif to take pm oath today