तिजोरीवर ६३८ दशलक्ष रुपयांचा बोजा
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या परदेश दौऱ्यांवर आतापर्यंत ६३८ दशलक्ष रुपये खर्च झाल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात असताना शरीफ हे आठवडय़ाच्या प्रत्येक पाचव्या दिवशी परदेशात असल्याचे बोलले जात आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने नॅशनल असेंब्लीत या बाबत माहिती देताना स्पष्ट केले की, शरीफ यांनी आतापर्यंत ६५ परदेश दौऱ्यांत १८५ दिवस परदेशात वास्तव्य केले आहे. या वेळी त्यांच्यासमवेत ६३१ अधिकाऱ्यांचा ताफाही होता, असे सांगण्यात आले.
शरीफ हे जून २०१३ मध्ये सत्तेवर आले, विरोधी पक्ष आणि माध्यमांकडून टीकेची झोड उठविण्यात येत असतानाही ते नियमितपणे परदेश दौरे करीत आहेत. त्यांच्या दौऱ्यापोटी दशाच्या तिजोरीवर ६३८.२७ दशलक्ष रुपयांचा बोजा पडला आहे.
इतकेच नव्हे तर आपल्या ९४० दिवसांच्या सत्तेत शरीफ केवळ ३५ वेळाच राष्ट्रीय असेंब्लीत उपस्थित राहिले आहेत.
शरीफ यांनी ब्रिटनचा १७ वेळा दौरा केला असून तेथे दवळपास दोन महिने वास्तव्य केले आहे. त्यापैकी ३२ दिवस त्यांचा अधिकृत दौरा होता तर २४ वेळा प्रवासात होते, असे असेंब्लीत सांगण्यात आले. प्रवासाच्या प्रत्येक वेळी शरीफ यांनी किमान दोन दिवस वास्तव्य केले आणि त्यापोटी तिजोरीवर १३७.८ दशलक्ष रुपये इतका बोजा पडला.
ब्रिटनपाठोपाठ शरीफ यांनी अमेरिकेचा दौरा केला असून त्या देशाला १८ वेळा भेटी दिल्या. त्याचप्रमाणे सौदी अरेबियाला पाच वेळा तर अमेरिका आणि चीनला चार वेळा भेटी दिल्या. तुर्कस्तान हे शरीफ यांचे आवडते ठिकाण असून दर वर्षी किमान एकदा त्यांनी तेथील दौरा केला आहे.
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवरील धनकोंकडून मोठय़ा प्रमाणावर कर्ज घेतले आहे. जागतिक बँकेने ऊर्जा क्षेत्रासाठी पाकिस्तानला ५०० दशलक्ष डॉलरचे कर्ज दिले आहे.

Story img Loader