पाकिस्तानातील विद्यमान लष्करावर आपला किंचितही विश्वास नसल्याचे स्पष्ट करीत पाकिस्तानातील तालिबान्यांनी, नवाझ शरीफ यांच्यासह पाकिस्तानातील तीन वरिष्ठ राजकीय नेत्यांनी पाक लष्कराबद्दल हमी दिल्यासच शांततामय वाटाघाटींच्या मार्गाचा विचार करू, असे सांगितले.
तेहरिक ए तालिबान पाकिस्तान या अतिरेकी संघटनेचा प्रवक्ता इहसानुल्लाह इहसान याने याबाबत अधिक माहिती दिली. लष्करावर आपण विश्वास ठेवावा अशी जर इच्छा असेल, तर जमात-ए-इस्लामी या राजकीय पक्षाचे प्रमुख मुनावर हसन, जमैत उलेमा ए इस्लामचे मौलाना फजलुर रेहमान आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी लष्कराची हमी घ्यावी, अशी मागणी इहसानने केली.
आजवर अनेकदा पाकिस्तानी लष्कराने तेहरिक ए तालिबान पाकिस्तानशी केलेले करार मोडले असल्याने ही मागणी करण्यात येत असल्याचे इहसानने नमूद केले. या मागणीबरोबरच पाक सरकारने मुस्लिम खान, हाजी उमर आणि मौलाना मेहमूद या तालिबानी राजकीय समितीच्या तीन सदस्यांची तातडीने सुटका करावी असेही इहसानने सांगितले. कारण या सुटकेशिवाय राजकीय चर्चा सुरळीत करणे तेहरिकला शक्या नसल्याचा दावा त्याने केला. या मागणीस शासनाने अनुकूल प्रतिसाद न दिल्यास शासन चर्चेबद्दल फारसे गंभीर नाही असे आम्ही मानू, असा इशाराही इहसानने पाक सरकारला दिला.
दरम्यान, तेहरिक इ तालिबान पाकिस्तानचा म्होरक्या हकीमुल्लाह मेहसूद याने गतवर्षी डिसेंबर महिन्यात काही पत्रकारांना पाठविलेल्या ध्वनिचित्रफितीत आपण सरकारशी वाटाघाटींना तयार असल्याचे मात्र शस्त्रसंधीस तयार नसल्याचे स्पष्ट केले होते.